
ब्रिस्बेन : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यात अखेर पावसानेच बाजी मारली. त्यामुळे ही लढत अनिर्णित राहिली. भारतीय गोलंदाजांनी पाचव्या दिवशी दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाला धक्के देत सामन्यात रंगत निर्माण केली होती. मात्र २७५ धावांचा पाठलाग करताना बिनबाद ८ धावांवरच पावसाचे आगमन झाले व त्यानंतर खेळ सुरू होणे शक्य झाले नाही.
गॅबा स्टेडियम, ब्रिस्बेन येथे झालेल्या या कसोटीत निकाल न लागल्याने उभय संघांतील ५ लढतींची मालिका अद्याप १-१ अशी बरोबरीत आहे. पहिल्या डावात १५२ धावांची खेळी साकारणारा ट्रेव्हिस हेड सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला. आता २६ डिसेंबरपासून मेलबर्न येथे उभय संघांतील चौथी म्हणजेच बॉक्सिंग डे कसोटी खेळवण्यात येईल. मात्र त्या कसोटीसाठी रविचंद्रन अश्विन भारतीय संघाचा भाग नसेल. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.
बॉर्डर-गावस्कर करंडकासाठी उभय संघांत ही पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येत आहे. कर्णधार रोहित शर्माच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत बुमराच्या नेतृत्वाखाली भारताने कांगारूंना २९५ धावांनी धूळ चारली. मात्र दुसऱ्या लढतीत गुलाबी चेंडूपुढे भारताची तारांबळ उडाली व ऑस्ट्रेलियाने पाहुण्यांना १० गडी राखून नेस्तनाबूत केले. त्यामुळे आता तिसरी लढत जिंकून मालिकेत आघाडी घेण्यासाठी दोन्ही संघांमध्ये चुरस आहे. या कसोटीच्या पहिल्या दिवशी फक्त १३.२ षटकांचा, दुसऱ्या दिवशी ८७ षटकांचा, तर तिसऱ्या दिवशी फक्त ३४ षटकांचा खेळ शक्य झाला होता. चौथ्या दिवशी ५८ षटकांचा खेळ झाला.
दरम्यान, मंगळवारच्या ९ बाद २५२ धावांवरून पुढे खेळताना भारताचा पहिला डाव २६० धावांवर संपुष्टात आला. हेडने आकाश दीपचा ३१ धावांवर अडसर दूर केला. बुमरा १० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात १८५ धावांची आघाडी मिळाली. मग दुसऱ्या डावाची सुरुवात होण्यापूर्वी जवळपास अर्धा तास पाऊस आला. डावाला सुरुवात झाल्यावर ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळ केला. मात्र याचा भारतीय गोलंदाजांनी लाभ उचलला. बुमराने उस्मान ख्वाजा (८) व मार्नस लबूशेन (१) यांना लागोपाठच्या षटकात बाद केले.
दुसऱ्या बाजूने आकाशने सुरेख साथ दिली. त्याने नॅथन मॅकस्वीनी (४) व मिचेल मार्श (२) यांना माघारी पाठवले. मग मोहम्मद सिराजने धोकादायक हेड (१७) व स्टीव्ह स्मिथ (४) यांना जाळ्यात अडकवले. कर्णधार पॅट कमिन्स (२२) व कॅरी (नाबाद २०) यांनी सातव्या विकेटसाठी २५ धावांची भर घातली. अखेर कमिन्स बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियाने १८ षटकांत ७ बाद ८९ धावांवर डाव घोषित केला. बुमराने या डावात ३ बळी मिळवले. भारतापुढे विजयासाठी ५४ षटकांत २७५ धावांचे लक्ष्य उभे ठाकले.
मात्र भारताचे सलामीवीर यशस्वी जैस्वाल व के. एल. राहुल यांनी प्रत्येकी ४ धावांसह संघाचा धावफलक २.१ षटकांत ८ धावांवर नेल्यावर पावसाचे आगमन झाले. त्यानंतर एक तास प्रतीक्षा करूनही पाऊस न थांबल्याने अखेर पंचांनी सामना अनिर्णित झाल्याचे जाहीर केले. आता उर्वरित चौथ्या व पाचव्या कसोटीत भारताने विजय मिळवल्यास ते जूनमध्ये होणाऱ्या जागतिक अजिंक्यपद लढतीच्या अंतिम फेरीसाठी पात्र ठरू शकतील.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ११७.१ षटकांत सर्व बाद ४४५
भारत (पहिला डाव) : ७८.५ षटकांत सर्व बाद २६०
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : १८ षटकांत ७ बाद ८९
भारत (दुसरा डाव) : २.१ षटकांत बिनबाद ८ (यशस्वी जैस्वाल नाबाद ४, राहुल नाबाद ४)
सामनावीर : ट्रेव्हिस हेड