अंकुर, विजय क्लब, लायन्स स्पोर्ट्स उपांत्य फेरीत; प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत अंकुरच्या विजयात अभिमन्यू पाटील, सिद्धेश तटकरे चमकले

लायन्स क्लबने दादरच्या शिवनेरी मंडळाचा ३८-३० असा पराभव केला. विश्रांतीला २३-१२ अशी आघाडी घेणाऱ्या लायन्सने नंतर सावध खेळ करीत विजयाची किमया साधली.
अंकुर, विजय क्लब, लायन्स स्पोर्ट्स उपांत्य फेरीत; प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेत अंकुरच्या विजयात अभिमन्यू पाटील, सिद्धेश तटकरे चमकले

मुंबई : अंकुर स्पोर्ट्स, विजय क्लब, लायन्स स्पोर्ट्स, सुनील स्पोर्ट्स या संघांनी विजय नवनाथ मंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित पुरुष प्रथम श्रेणी कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक मारली. अंकुर विरुद्ध लायन्स आणि विजय क्लब विरुद्ध सुनील स्पोर्ट्स अशा उपांत्य लढती होतील.

लोअर परेल येथील फिनिक्स टॉवर शेजारील मैदानात रंगलेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात सातरस्त्याच्या अंकुरने काळाचौकीच्या अमर क्रीडा मंडळाचा २८-२१ असा पराभव केला. आक्रमक सुरुवात करीत अंकुरने पहिला लोण देत आघाडी घेतली. विश्रांतीला १८-०८ अशी आश्वासक आघाडी अंकुरकडे होती. अभिमन्यू पाटील, सिद्धेश तटकरे यांच्या चढाई पकडीच्या खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

दादरच्या विजय क्लबने पूर्वार्धातील ०९-१५ अशा पिछाडीवरून शिवशक्ती मंडळाचा प्रतिकार ३३-२२ असा मोडून काढला. दीपक शिंदे, साई चौगुले यांच्या धारदार चढाया, आदर्श गोडसे याच्या बचावाच्या जोरावर शिवशक्तीने पूर्वार्धात महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती. नंतर मात्र ते ढेपाळले. उत्तरार्धात विजय क्लबच्या राज नाटेकर, कार्तिक मिश्रा यांनी आक्रमक चढाया करीत भरभर गुण घेतले.

लायन्स क्लबने दादरच्या शिवनेरी मंडळाचा ३८-३० असा पराभव केला. विश्रांतीला २३-१२ अशी आघाडी घेणाऱ्या लायन्सने नंतर सावध खेळ करीत विजयाची किमया साधली. राज आचार्य, ऋषिकेश कणेरकर, बाजीराव होडगे लायन्सकडून, तर यश चोरगे, अजय गुरव शिवनेरीकडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात सुनील स्पोर्ट्सने वरळी कोळीवाड्याच्या गोल्फादेवी सेवा मंडळावर ४४-२७ असा सहज विजय मिळविला. रोहन जाधव, शोएब मुल्ला यांच्या चतुरस्त्र खेळाला या विजयाचे श्रेय जाते.

logo
marathi.freepressjournal.in