भारत-नेपाळ लढतीद्वारे पहिल्या खो-खो विश्वचषकाचा शुभारंभ! १३ जानेवारीपासून दिल्लीत रंगणार स्पर्धा

महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेण्यासाठी सज्ज आहे.
भारत-नेपाळ लढतीद्वारे पहिल्या खो-खो विश्वचषकाचा शुभारंभ! १३ जानेवारीपासून दिल्लीत रंगणार स्पर्धा
एक्स @Kkwcindia
Published on

ऋषिकेश बामणे/मुंबई

महाराष्ट्राच्या मातीतील खो-खो हा खेळ आता नव्या रंगात, नव्या ढंगात जगभरात झेप घेण्यासाठी सज्ज आहे. नवी दिल्ली येथे १३ ते १९ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या पहिल्या विश्वचषक खो-खो स्पर्धेचे वेळापत्रक भारतीय खो-खो महासंघातर्फे (केकेएफआय) मंगळवारी जाहीर करण्यात आले. सहा खंडांमधील २४ देश या स्पर्धेत सहभागी झाले असून पुरुष व महिला अशा दोन्ही गटांत मिळून ३९ संघांत ही स्पर्धा खेळवण्यात येईल. भारत विरुद्ध नेपाळ या पुरुष गटातील लढतीद्वारे स्पर्धेचा शुभारंभ होईल.

गेल्या काही वर्षांपासून खो-खो झपाट्याने भरारी घेत आहे. राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवरील खो-खो स्पर्धांना नेहमीच दर्दी क्रीडाप्रेमी गर्दी करतात. त्यानंतर अनुक्रमे पुणे आणि ओदिशा येथे झालेल्या अल्टिमेट खो-खो लीगच्या दोन पर्वांनाही चाहत्यांचा दमदार प्रतिसाद लाभला. त्यामुळे ऑक्टोबरमध्ये केकेएफआयने खो-खोच्या पहिल्या विश्वचषकाची घोषणा केली. आता नवी दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय इनडोअर स्टेडियमवर होणारी विश्वचषक स्पर्धा मॅटवर खेळवण्यात येईल. या स्पर्धेसाठी भारताचे संघही लवकरच जाहीर करण्यात येतील. सध्या भारतीय संघांचे दिल्लीतच सराव शिबीर सुरू आहे. ७ दिवस रंगणाऱ्या विश्वचषकाचे स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि हॉटस्टार ॲपवर थेट प्रक्षेपण करण्यात येईल. २०३२च्या ऑलिम्पिकमध्ये खो-खोचा समावेश व्हावा, या हेतूने विश्वचषक आयोजनाचे पाऊल उचलण्यात आले आहे. देशभरातील चाहत्यांनी या स्पर्धेला पाठिंबा द्येऊन खेळाडूंचा उत्साह वाढवावा, असे आवाहन केकेएफआयचे अध्यक्ष सुधांशू मित्तल यांनी केले आहे.

सोमवार, १३ जानेवारी रोजी स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार पडल्यानंतर भारत-नेपाळ यांच्यातील लढत रात्री ८.३० वाजता सुरू होईल. पुरुषांमध्ये २०, तर महिलांत १९ संघांचा समावेश असेल. प्रत्येकी पाच संघांचा एक गट असेल. फक्त महिलांमध्ये पहिल्या गटात चारच संघ असतील. महिला गटात भारतीय संघ दक्षिण कोरियाशी सलामीला दोन हात करणार असून ही लढत १४ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता होईल. १६ जानेवारीला साखळी फेरी संपल्यानंतर प्रत्येक गटातून आघाडीचे दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता प्रथम महिलांचा अंतिम सामना खेळवण्यात येईल. त्याच दिवशी रात्री ८.३० वाजता पुरुषांची अंतिम लढत होईल.

बॉलीवूड अभिनेता सलमान खान या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे. त्याशिवाय भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने (आयओए) या स्पर्धेला पाठिंबा दर्शवला आहे. पुरुष गटातील विजेत्याला निळ्या रंगाचा आणि महिलांमधील विजेत्याला हिरव्या रंगाचा चषक दिला जाणार आहे. निळ्या रंगाचा चषक विश्वास, दृढनिश्चय आणि सार्वत्रिक अपील यांचे प्रतीक आहे, तर हिरव्या रंगाचा चषक प्रगती आणि चैतन्य दर्शवते. तेजस आणि तारा ही हरणाची जोडी या स्पर्धेचे शुभंकर असतील. यांसारख्या विविध बाबींमुळे एकूणच आता खो-खोप्रेमींना पहिल्यावहिल्या विश्वचषकाची ओढ लागली आहे, यात शंका नाही.

गोविंद शर्मा भारताच्या निवड समितीत

महाराष्ट्र खो-खो संघटनेचे खजिनदार ॲड. गोविंद शर्मा यांची भारतीय खो-खो संघाच्या निवड समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. दिल्ली येथे भारताच्या दोन्ही संघांचे सराव शिबीर सुरू असून ९ जानेवारीपर्यंत भारताचे पुरुष व महिला संघ जाहीर केले जातील. या निवडीमध्ये गोविंद महत्त्वाची भूमिका बजावतील. भारतीय खो-खो महासंघाचे अध्यक्ष सुधांशू मित्तल या निवडीवर लक्ष ठेवून असतील. छत्रपती संभाजीनगरचे निवासी आणि संभाजीनगर जिल्हा खो-खो संघटनेचे माजी सचिव गोविंद यांचा क्रीडा क्षेत्रातील दीर्घ अनुभव आणि योगदान या नियुक्तीमागील मोलाचे घटक आहेत. २०१६ पासून त्यांनी भारतीय खो-खो महासंघाच्या पुरस्कार समिती सदस्य म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी खेलो इंडिया, राज्य शालेय स्पर्धा, राष्ट्रीय स्पर्धा आणि नेपाळविरुद्ध झालेल्या खो-खो कसोटी सामन्यांमध्ये प्रशिक्षक आणि तांत्रिक अधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे.

ओदिशा शासनाकडून ३ वर्षांचे प्रायोजकत्व

हॉकीसाठी सातत्याने पुढाकार घेणाऱ्या ओदिशा सरकारने आता खो-खोसाठीही धाव घेतली आहे. भारताच्या दोन्ही खो-खो संघांना पुढील ३ वर्षे प्रायोजकत्व देण्याचा निर्णय ओदिशा शासनाने घेतला आहे. ओदिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी मंगळवारी याविषयी घोषणा केली. दरवर्षी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी भारतीय खो-खो संघांना पुरवण्यात येणार आहे. त्यामुळे भारतीय खो-खो महासंघाने ओदिशाचे विशेष आभार मानले आहेत. २०२३मध्ये अल्टिमेट खो-खो लीगचे दुसरे पर्वही ओदिशामध्येच झाले होते. तूर्तास विश्वचषकामुळे अल्टिमेट लीगचे तिसरे पर्व मात्र लांबणीवर पडले आहे.

गटवारी (पुरुष)

अ-गट : भारत, नेपाळ, ब्राझील, भूतान, पेरू.

ब-गट : दक्षिण आफ्रिका, घाना, अर्जेंटिना, नेदरलँड्स, इराण.

क-गट : श्रीलंका, बांगलादेश, दक्षिण कोरिया, अमेरिका, पोलंड.

ड-गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, मलेशिया, केनिया.ॉ

गटवारी (महिला)

अ-गट : भारत, इराण, मलेशिया, दक्षिण कोरिया.

ब-गट : इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, नेदरलँड्स.

क-गट : जर्मनी, नेपाळ, भूतान, श्रीलंका, बांगलादेश.

ड-गट : दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, पोलंड, पेरू, इंडोनेशिया.

logo
marathi.freepressjournal.in