कसोटी हार्दिकची; संधी प्रयोगाची! मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना

हार्दिकने संघाचे यशस्वी नेतृत्व करताना न्यूझीलंड, श्रीलंका संघांविरुद्ध मालिका जिंकवून दिल्या. त्यामुळे आता एकदिवसीय प्रकारात हार्दिक त्याचे नेतृत्वकौशल्य कशाप्रकारे दाखवतो, हे पाहणे रंजक
कसोटी हार्दिकची; संधी प्रयोगाची! मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आज भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला एकदिवसीय सामना

वर्षाच्या अखेरीस भारतात एकदिवसीय विश्वचषकाचा थरार रंगणार आहे. त्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ अद्यापही सर्वोत्तम १५ खेळाडूंचा शोध घेत आहे. त्यामुळे शुक्रवारपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत भारताला विविध प्रयोग करण्याची संधी आहे. मुंबईकर रोहित शर्मा खासगी कारणास्तव या लढतीसाठी उपलब्ध नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाचीही कसोटी लागणार आहे.

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर उभय संघ पहिल्या एकदिवसीय लढतीत आमनेसामने येणार असून २९ वर्षीय हार्दिक प्रथमच ५० षटकांच्या सामन्यात भारताचे नेतृत्व करणार आहे. गेल्या वर्षी त्याच्या कर्णधारपदाखाली गुजरात जायंट्सने पदार्पणातच आयपीएलचे जेतेपद मिळवले. टी-२० विश्वचषकात भारताने उपांत्य फेरीत पराभव पत्करल्यानंतर प्रामुख्याने रोहितने टी-२० मालिकांमधून विश्रांती घेतली. त्यावेळी हार्दिकने संघाचे यशस्वी नेतृत्व करताना न्यूझीलंड, श्रीलंका संघांविरुद्ध मालिका जिंकवून दिल्या. त्यामुळे आता एकदिवसीय प्रकारात हार्दिक त्याचे नेतृत्वकौशल्य कशाप्रकारे दाखवतो, हे पाहणे रंजक ठरेल.

गिल-किशन सलामीला

गेल्या सहा सामन्यांत तीन शतके झळकावणाऱ्या शुभमन गिलचे सलामीचे स्थान पक्के असून रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यासोबत इशान किशन सलामीला उतरणार आहे. कर्णधार हार्दिकने पत्रकार परिषदेदरम्यान याविषयी माहिती दिली. त्यामुळे के. एल. राहुल पाचव्या क्रमांकावर खेळण्यासह यष्टीरक्षकाची भूमिका बजावेल, असे दिसते. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली, तर चौथ्या स्थानावर श्रेयस अय्यरच्या अनुपस्थितीत मुंबईच्याच सूर्यकुमार यादवला प्राधान्य दिले जाईल. हार्दिक आणि रवींद्र जडेजा अष्टपैलू योगदान देण्यास उत्सुक असतील.

स्मिथ, वॉर्नरपासून सावध

पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत स्टीव्ह स्मिथने कसोटी मालिकेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करताना भारताला कडवी झुंज दिली. आता एकदिवसीय मालिकेतही तो छाप पाडण्यास आतुर आहे. त्याशिवाय अनुभवी डावखुरा फलंदाज डेव्हिड वॉर्नरचे संघात पुनरागमन झाले आहे. जानेवारी २०२०मध्ये भारताविरुद्ध वानखेडे येथे झालेल्या सामन्यात वॉर्नरने शतक झळकावून ऑस्ट्रेलियाला एकहाती विजय मिळवून दिला होता. गोलंदाजीत मिचेल स्टार्कवर ऑस्ट्रेलियाची भिस्त असून ॲडम झम्पा त्यांचे फिरकीचे अस्त्र असेल.

कुलदीप-चहलचा कसून सराव

मनगटी फिरकीपटू कुलदीप यादव आणि लेगस्पिनर युझवेंद्र चहल यांची फिरकी जोडी जानेवारीत न्यूझीलंडविरुद्ध तीन वर्षांनी एकत्रित खेळली. विश्वचषकाच्या दृष्टीने ही जोडी भारतासाठी मोलाची असून त्यांनी दोन्ही दिवस एकत्रितपणे कसून सराव केला. परंतु जडेजासह या दोघांपैकी एकाच फिरकीपटूला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे. गोलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थानी असणारा मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी वेगवान गोलंदाजीची धुरा वाहतील.

भारत : हार्दिक पंड्या (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सूर्यकुमार यादव, इशान किशन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, ट्रेव्हिस हेड, मार्नस लबूशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, ॲलेक्स कॅरी, कॅमेरून ग्रीन, जोश इंग्लिस, सीन ॲबट, ॲश्टन ॲगर, मिचेल स्टार्क, नॅथन एलिस, ॲडम झम्पा.

तिकिटविक्री फुल्ल

वानखेडेवर प्रकाशझोतात होणाऱ्या सामन्यांमध्ये लक्ष्याचा पाठलाग करणे नेहमीच सोपे गेले आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करणे सोयीचे ठरेल. चौकार-षटकारांची बरसात या लढतीत अपेक्षित आहे. सामन्यासाठी जवळपास १ हजारांहून पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला असून सामन्याची सर्व तिकिटे ऑनलाइन विकली गेली असल्याचे एमसीएच्या पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.

श्रेयस अय्यरची दुखापत संघाला घातक ठरू शकते. परंतु अन्य खेळाडूंनी या संधीचा लाभ उचलणे गरजेचा आहे. ऋषभ पंत, जसप्रीत बुमरा लवकरच भारतीय संघात पुनरागमन करतील, अशी आशा आहे. सध्या माझे एकमेव लक्ष्य हे भारतासाठी एकदिवसीय विश्वचषक जिंकवून देण्याचेच आहे. त्यामुळे मी पुन्हा कसोटी क्रिकेटकडे वळण्याचा विचार अद्याप केलेला नाही. आयपीएलमध्ये मुंबईकडून वानखेडेवर खेळतानाचा अनुभव अविस्मरणीय होता. येथील चाहते नेहमीच मला पाठिंबा दर्शवतात.

- हार्दिक पंड्या, भारताचा कर्णधार

भारताने २०२३मध्ये झालेल्या आतापर्यंतच्या सहाही एकदिवसीय सामन्यांत विजय मिळवला आहे. भारताने जानेवारी महिन्यात श्रीलंका, न्यूझीलंड यांना प्रत्येकी ३-० अशी धूळ चारली होती.

हार्दिक हा एकदिवसीय प्रकारात भारताचे नेतृत्व करणारा २७वा कर्णधार ठरणार आहे.

वेळ : दुपारी १.३० वाजल्यापासून

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, हिंदी १ आणि हॉटस्टार ॲप

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in