भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी आजपासून ; मुंबईकर यशस्वीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

आगामी जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत भारताला पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी काही ठोस निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे
भारत-वेस्ट इंडिज यांच्यातील पहिली कसोटी आजपासून ; मुंबईकर यशस्वीला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता

वृत्तसंस्था/डॉमिनिका : जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेतील अपयश बाजूला सारून भारतीय क्रिकेट संघ नव्या संघबांधणीची मुहूर्तमेढ करण्यासाठी सज्ज होणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध रंगणाऱ्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला बुधवारपासून प्रारंभ होणार असून मुंबईचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वालला पहिल्या लढतीत पदार्पणाची संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.

जून महिन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यापुढे आगामी जागतिक अजिंक्यपदाच्या शर्यतीत भारताला पुन्हा एकदा अंतिम फेरीपर्यंत नेण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी काही ठोस निर्णय घेऊन अनुभवी खेळाडूंना संघाबाहेरचा रस्ता दाखवून युवकांची चाचपणी केली जाणार आहे. तिसऱ्या क्रमांकावरील भरवशाचा फलंदाज मानला जाणाऱ्या चेतेश्वर पुजाराला वगळणे, हे यांपैकीच एक उदाहरण.

२१ वर्षीय यशस्वीने आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून छाप पाडतानाच स्थानिक क्रिकेटमध्ये मुंबईसाठी सातत्याने धावा केल्या. तसेच त्याच्या समावेशामुळे भारताला पहिल्या पाच फलंदाजांत डावखुरा पर्याय उपलब्ध होईल. यशस्वी प्रथम श्रेणी तसेच आयपीएलमध्येही सलामीला फलंदाजीस येतो. नुकताच झालेल्या सराव सामन्यातसुद्धा यशस्वी सलामीलाच आला होता. अशा स्थितीत बुधवारी त्याला पदार्पणाची संधी दिली व भारताची प्रथम फलंदाजी आल्यास तो कोणत्या क्रमांकावर येणार, हे पाहणे रंजक ठरेल.

ऋतुराज, किशन यांच्यातही स्पर्धा

यशस्वी रोहितच्या साथीने सलामीला आल्यास तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिल येईल, हे नक्की. गिलने यापूर्वी १९ वर्षांखालील चषकापासून ते स्थानिक क्रिकेटमध्ये बहुतांशी तिसऱ्या क्रमांकावरच फलंदाजी केली आहे. त्यानंतर चौथ्या व पाचव्या स्थानी विराट कोहली व अजिंक्य रहाणे हे अनुभवी खेळाडू फलंदाजीस येतील. यष्टिरक्षकाच्या जागेसाठी के. एस. भरत व इशान किशन यांच्यात स्पर्धा आहे. तसेच यशस्वीऐवजी महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडलाही पदार्पणाची संधी देता येऊ शकते.

तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी चुरस

मोहम्मद शमीला विश्रांती देण्यात आल्याने मोहम्मद सिराज भारतीय गोलंदाजीचे नेतृत्व करेल. तसेच विंडीजच्या खेळपट्ट्यांचा विचार करता शार्दूल ठाकूर दुसरा मध्यमगती गोलंदाज असेल. तिसऱ्या वेगवान गोलंदाजासाठी मात्र जयदेव उनाडकट, नवदीप सैनी आणि बंगालचा मुकेश कुमार यांच्यात चुरस आहे. रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा अपेक्षेप्रमाणे फिरकीची बाजू सांभाळतील.

रोच, ब्रेथवेटवर विंडीजची भिस्त

कर्णधार क्रेग ब्रेथवेट आणि अनुभवी वेगवान गोलंदाज केमार रोच यांच्यावर प्रामुख्याने विंडीजची भिस्त असेल. रोचच्या नावावर २६१ कसोटी बळी आहेत. फलंदाजीत त्यांच्याकडे जर्मेन ब्लॅकवूड व शिवनरिन चंदरपॉलचा मुलगा टेगनरिन असे पर्याय आहेत. नुकताच विंडीजवर एकदिवसीय विश्वचषकाला मुकण्याची नामुष्की ओढवली. यातून सावरत ते कसोटी मालिकेत दमदार कामगिरी करून भारताला कडवी झुंज देतील, अशी आशा आहे.

22-30

उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ९८ कसोटी सामन्यांपैकी भारताने २२, तर विंडीजने ३० लढती जिंकल्या आहेत. उर्वरित ४६ कसोटी अनिर्णित राहिल्या आहेत.

संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, ऋतुराज गायकवाड, के. एस. भरत, इशान किशन, रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, शार्दूल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज : क्रेग ब्रेथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवूड, जोशुआ डा सिल्व्हा, अलिक अथान्झे, रहकीम कोर्नवॉल, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, रायमन रेफर, केमार रोच, टेगनरिन चंदरपॉल, किर्क मॅकेन्झी, जोमेल वॅरिकन.

वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून
थेट प्रक्षेपण : डीडी नॅशनल आणि जिओ सिनेमा अॅप

logo
marathi.freepressjournal.in