क्रिकेटचा हंगाम आजपासून सुरू! भारत-बांगलादेश यांच्यात चेन्नईत रंगणार पहिला कसोटी सामना; प्रमुख खेळाडू संघात परतले

India-Bangladesh Test Series: पॅरिस ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर गणेशोत्सवात मग्न झालेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी गुरुवारपासून पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे.
क्रिकेटचा हंगाम आजपासून सुरू! भारत-बांगलादेश यांच्यात चेन्नईत रंगणार पहिला कसोटी सामना; प्रमुख खेळाडू संघात परतले
PTI
Published on

India vs Bangladesh 1st Test: चेन्नई : पॅरिस ऑलिम्पिक व पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा आणि त्यानंतर गणेशोत्सवात मग्न झालेल्या भारतीय क्रिकेटप्रेमींसाठी गुरुवारपासून पुन्हा एकदा मनोरंजनाची पर्वणी उपलब्ध होणार आहे. एका महिन्याच्या विश्रांतीनंतर भारतीय क्रिकेट संघाचा मायदेशातील आंतरराष्ट्रीय मालिकांचा हंगाम सुरू होणार असून खेळाडूंसह चाहतेही या हंगामासाठी सज्ज झाले आहेत. भारत-बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत गुरुवारपासून चेन्नई येथे खेळवण्यात येणार आहे.

मुंबईकर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने जूनमध्ये टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवले. त्यानंतर गौतम गंभीरने प्रशिक्षकपद स्वीकारल्यावर भारताने श्रीलंका दौरा केला. यामध्ये टी-२० मालिकेत भारताने वर्चस्व गाजवले. मात्र एकदिवसीय मालिकेत भारताच्या पदरी निराशा पडली. आता एका महिन्याच्या विश्रांतीनंतर रोहितचे शिलेदार लाल चेंडूच्या आव्हानास सामोरे जाण्यासाठी आतुर आहेत. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेनंतर न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांसारख्या बलाढ्य संघांशी भारतीय संघ विविध प्रकारांत दोन हात करणार आहे. तसेच पुढील वर्षी होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी (एकदिवसीय) आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी या दृष्टीने आगामी काळ महत्त्वाचा आहे. त्यामुळे एकूणच भारत-बांगलादेश मालिकेची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

चेन्नईच्या एम. ए. चिदम्बरम स्टेडियमवर होणाऱ्या या लढतीत निश्चितच भारताचे पारडे जड मानले जात आहे. मार्च महिन्यात मायदेशात झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताने ४-१ असे यश संपादन केले. मुख्य म्हणजे गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात फक्त ४ कसोटी सामने गमावले आहेत. यावरूनच भारताचे वर्चस्व अधोरेखित होते. त्यामुळे आता सर्व प्रमुख खेळाडूंसह तसेच नव्या प्रशिक्षकीय चमूसह प्रथमच कसोटी मालिका खेळताना भारतीय संघ पुन्हा चमक दाखवेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

दुसरीकडे नजमूल होसेन शांतोच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बांगलादेशने नुकताच पाकिस्तानला कसोटी मालिकेत २-० अशी धूळ चारली. २०००पासून कसोटी क्रिकेट खेळण्यास प्रारंभ करणाऱ्या बांगलादेशला अद्याप भारताविरुद्ध एकही लढत जिंकता आलेली नाही. मात्र यंदा ते इतिहास बदलण्यासाठी उत्सुक आहेत. चेपॉकची खेळपट्टी फिरकीपटूंसाठी पोषक असून येथील उष्णतेचेही खेळाडूंपुढे आव्हान असेल.

फिरकी जोडी आणि बुमराचे ब्रम्हास्त्र

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांची फिरकी जोडी गेल्या दशकभरापासून भारताच्या कसोटी संघाचा अविभाज्य घटक आहेत. त्यामुळे त्यांच्यापासून बांगलादेशला सावध रहावे लागेल. त्याशिवाय विश्वातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा जसप्रीत बुमरा या मालिकेसाठी परतल्याने भारताची गोलंदाजी अधिक बळकट झाली आहे. तिसरा फिरकीपटू म्हणून कुलदीप यादवला स्थान मिळण्याची दाट शक्यता आहे. मोहम्मद सिराज बुमराच्या साथीने वेगवान गोलंदाजीची धुरा वाहील. अक्षर पटेलला संधी मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागेल.

रोहित, विराटवर भिस्त

फलंदाजीत भारताची मदार निश्चितच रोहित, विराट कोहली यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर आहे. तसेच अपघातातून सावरलेला यष्टिरक्षक ऋषभ पंत आता पुनरागमनासाठी सज्ज आहे. यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल व के. एल. राहुल यांचे स्थान निश्चित मानले जात आहे. विराट गेल्या काही वर्षांपासून कसोटीत अपयशी ठरत असून यावर्षी त्याने मायदेशात अद्याप एकही कसोटी खेळलेली नाही. त्यामुळे त्याच्या कामगिरीकडे चाहत्यांचे लक्ष असेल. ध्रुव जुरेल, सर्फराझ खान यांना मात्र संघाबाहेर रहावे लागेल, असे दिसते.

मेहदी, शाकिबकडून अपेक्षा

पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी मालिकेत मोलाची भूमिका बजावणारा अष्टपैलू मेहदी हसन मिराज, अनुभवी शाकिब अल हसन यांच्यावर बांगलादेशची भिस्त असेल. त्याशिवाय लिटन दास, मुशफिकूर रहीम असे प्रतिभावान फलंदाजही त्यांच्या ताफ्यात आहेत. हसन महमूद आणि नाहिद राणा वेगवान गोलंदाजीचा विभाग सांभाळतील. बांगलादेशसाठी यंदाच्या वर्षात सर्वाधिक धावा तसेच सर्वाधिक बळी मिळवणाऱ्यांच्या यादीत मेहदी हसनच अग्रस्थानी असल्याने तो संघासाठी हुकमी एक्का ठरू शकतो.

> गेल्या १२ वर्षांत भारताने मायदेशात एकही कसोटी मालिका गमावलेली नाही. २०१२मध्ये इंग्लंडने भारताला नमवले होते. त्यानंतर भारताने मायदेशात सलग १७ कसोटी मालिका जिंकल्या आहेत.

> उभय संघांत आतापर्यंत झालेल्या १३ कसोटी सामन्यांपैकी भारताने ११ लढती जिंकल्या आहेत. दोन सामने अनिर्णित राहिले आहेत. बांगलादेशचा संघ अद्यापही भारताविरुद्ध पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत आहे.

प्रतिस्पर्धी संघ

> भारत : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, के. एल. राहुल, सर्फराझ खान, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप, जसप्रीत बुमरा, यश दयाल.

> बांगलादेश : नजमूल होसेन शांतो (कर्णधार), महमदुल हसन जॉय, झाकीर हसन, शदमन इस्लाम, मोमिनुल हक, मुशफिकूर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास, मेहदी हसन मिराज, तैजुल इस्लाम, नयीम हसन, नाहिद राणा, हसन महमूद, तस्किन अहमद, खलीद अहमद, जेकर अली.

  • वेळ : सकाळी ९.३० वाजल्यापासून

  • थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in