बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १८व्या पर्वातील उर्वरित सामन्यांना शनिवारपासून पुन्हा सुरुवात होईल. बंगळुरूतील एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर जेव्हा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाइट रायडर्स आमनेसामने येतील, तेव्हा आपसुकच सर्वाधिक लक्ष जाईल ते नुकताच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेल्या विराट कोहलीकडे. मात्र या लढतीवर पावसाचे सावट असल्याने चाहत्यांचा हिरमोडही होऊ शकतो.
२२ मार्चपासून बंगळुरू-कोलकाता यांच्यातीलच लढतीद्वारे सुरू झालेला आयपीएलचा यंदाचा हंगाम ७ मेपर्यंत उत्तमरित्या सुरू होता. मात्र ८ मे रोजी दिल्ली-पंजाब यांच्यातील ५८वा सामना मध्यातच थांबवण्यात आला. पंजाब तसेच जम्मू-कश्मीर येथे पाकिस्तानने ड्रोनद्वारे केलेल्या हल्ल्यांमुळे ही लढत मध्यातच स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुढच्याच दिवशी भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती.
मात्र १२ मे रोजी एकीकडे विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केलेली असतानाच रात्री १०च्या सुमारास बीसीसीआयने आयपीएल पुन्हा सुरू करण्याबाबत घोषणा केली. त्यामुळे आता १७ मे ते ३ जून या कालावधीत उरलेले १७ सामने खेळवण्यात येणार आहेत. शनिवारपासून पुन्हा एकदा चाहत्यांना टी-२०चा थरार पाहायला मिळणार आहे. त्यातच विराटने कसोटीतून निवृत्ती जाहीर केल्यामुळे त्याला आता फक्त आयपीएल आणि भारताच्या एकदिवसीय सामन्यांतच चाहत्यांना खेळताना पाहता येईल. यामुळेच चिन्नास्वामीच्या बाहेर विराटच्या कसोटीतील जर्सीही मोठ्या प्रमाणात विकण्यात येत आहेत.
दरम्यान, रजत पाटीदारच्या नेतृत्वात खेळणारा बंगळुरू संघ सध्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे. त्यांनी ३ मे रोजी खेळलेल्या अखेरच्या लढतीत चेन्नईला नमवले होते. ९ मे रोजी बंगळुरूची लखनऊशी गाठ पडणार होती. मात्र त्या दिवसापासूनच आयपीएल स्थगित झाली. आता बंगळुरूसमोर घरच्या मैदानात पुन्हा लय मिळवण्याचे आव्हान असेल.
दुसरीकडे कोलकाता संघ १२ सामन्यांतील ११ गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानी आहे. त्यांनाही स्पर्धेतील आव्हान टिकवण्यासाठी उर्वरित दोन्ही लढती मोठ्या फरकाने जिंकण्यासह अन्य निकालांवरही अवलंबून रहावे लागेल. चिन्नास्वामीत धावांचा पाठलाग करणे सोपे गेले असून येथे १९० ते २०० धावा पुरेशा ठरत नाहीत. मात्र शनिवारी ५० ते ६० टक्के पावसाची शक्यता असल्याने सामना कमी षटकांचा किंवा पूर्णपणे रद्दही होऊ शकतो.
प्रतिस्पर्धी संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू : रजत पाटीदार (कर्णधार), विराट कोहली, यश दयाल, अभिनंदन सिंग, भुवनेश्वर कुमार, जेकब बिथेल, जितेश शर्मा, कृणाल पंड्या, लियाम लिव्हिंगस्टोन, लुंगी एन्गिडी, मनोज भडांगे, मोहित राठी, नुवान थुशारा, फिल सॉल्ट, रसिक डार, रोमारिओ शेफर्ड, सुयश शर्मा, स्वप्निल सिंग, स्वस्तिक चिकारा, टिम डेव्हिड, मयांक अगरवाल.
कोलकाता नाइट रायडर्स : अजिंक्य रहाणे (कर्णधार), आंद्रे रसेल, वेंकटेश अय्यर, सुनील नरिन, रिंकू सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, रमणदीप सिंग, अंक्रिश रघुवंशी, अनुकूल रॉय, लुवनित सिसोडिया, मनीष पांडे, मयांक मार्कंडे, आनरिख नॉर्किए, मोईन अली, क्विंटन डीकॉक, रहमनुल्ला गुरबाझ, रोवमन पॉवेल, स्पेन्सर जॉन्सन, वैभव अरोरा, चेतन साकरिया.
उभय संघांत आतापर्यंत झालेल्या ३५ सामन्यांपैकी बंगळुरूने १५, तर कोलकाताने २० लढतींमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे आकडेवारी सध्या कोलकाताच्या बाजूने असली तरी बंगळुरूचा संघ लयीत आहे. तसेच पहिल्या टप्प्यातील सामन्यातही बंगळुरूने कोलकातावर सहज वर्चस्व गाजवले होते.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप
भुवनेश्वरकडून सुधारणा अपेक्षित
बंगळुरूचा कर्णधार पाटीदार गेल्या काही सामन्यांत अपयशी ठरत आहे. मुंबईविरुद्ध साकारलेल्या अर्धशतकानंतर सात लढतींमध्ये तो एकदाही २५ धावांपुढे जाऊ शकलेला नाही. त्यातच आता तिसऱ्या क्रमांकावरील देवदत्त पडिक्कलही दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला. त्यामुळे आता पाटीदारवरील दडपण वाढेल. विराट कोहली व जेकब बिथेल यांची सलामी जोडी सातत्याने योगदान देत आहे. त्यातच टिम डेव्हिड व रोमारिओ शेफर्ड यांच्या स्वरुपात अखेरच्या षटकांत धडाकेबाज फलंदाजही बंगळुरूकडे आहेत. अनुभवी वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने भारतात परतण्यास नकार दिला आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमारवर दडपण वाढले असून त्याला कामगिरी उंचवावी लागणार आहे. यश दयाल व सुयश शर्मा सातत्याने छाप पाडत आहेत. गेल्या १७ वर्षांपासून बंगळुरूला विजेतेपदाने सातत्याने हुलकावणी दिली. त्यामुळे यंदा त्यांना जेतेपद मिळवण्यासाठी सर्वोत्तम संधी असल्याचे जाणकारांचे मत आहे.
या विदेशी खेळाडूंची आतापर्यंत माघार
आयपीएलचा १८वा हंगाम पुन्हा सुरू होत असला तरी अंतिम फेरी ३ जूनपर्यंत लांबणार असल्याने अनेक विदेशी खेळाडूंनी भारतात परतण्यास अथवा भारतात थांबण्यास नाकर दिला आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज यांच्यात २९ तारखेपासून एकदिवसीय मालिका सुरू होईल, तर ११ जूनपासून दक्षिण आफ्रिका-ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) अंतिम फेरी होणार असल्याने त्या-त्या संघातील खेळाडूही मायदेशी परततील.
तूर्तास, जोश हेझलवूड (बंगळुरू) व मिचेल स्टार्क (दिल्ली) यांनी भारतात माघारी न परतता ऑस्ट्रेलियातच थांबण्याचे ठरवले आहे. तसेच जोस बटलर २५ तारखेपर्यंत इंग्लंडला जाणार असल्याने गुजरात संघाने त्याच्या जागी श्रीलंकेच्या कुशल मेंडिसची निवड केली आहे. लुंगी एन्गिडी (बंगळुरू), रायन रिकल्टन, कॉर्बिन बोश (मुंबई), एडीन मार्करम (लखनऊ), मार्को यान्सेन (पंजाब) हे सर्व आफ्रिकन खेळाडू २६ मे रोजी त्यांच्या मायदेशी परततील.
कोलकाताच्या मोईन अली, रोवमन पॉवेल यांनीही भारतात येण्यास नकार दर्शवला आहे. तर मुंबईकडून खेळणारा विल जॅक्स साखळी स्पर्धेनंतर इंग्लंडला परतणार आहे. त्यामुळे एकूणच विदेशी खेळाडूंसाठी पर्यायी खेळाडूंचा शोध सुरू आहे.
आयपीएलमध्ये यंदा काय घडले?
यंदाच्या आयपीएलमध्ये ७ मेपर्यंत ५७ सामने पूर्ण झाले होते. सध्या गुणतालिकेत गुजरातचा संघ १६ गुणांसह अग्रस्थानी आहे. बंगळुरूचेही १६ गुण आहेत. मात्र नेट रनरेटमध्ये गुजरात त्यांच्यापेक्षा पुढे आहे. पंजाब (१५ गुण), मुंबई (१४) हे संघही अव्वल चार संघांत आहेत. हैदराबाद, राजस्थान व चेन्नई या संघांचे आव्हान संपुष्टात आले असून कोलकाता, लखनऊ व दिल्ली अद्याप शर्यतीत टिकून आहेत. त्यामुळे चार स्थानांसाठी एकूण सात संघांत पुढील काही दिवस संघर्ष पाहायला मिळेल.