नवी दिल्ली : १०० ग्रॅम अतिरिक्त वजनामुळे पदक गमावणाऱ्या भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला पाठिंबा दर्शवण्यासाठी सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग यांसारख्या माजी क्रिकेटपटूंनी पुढाकार घेतला आहे.
महिलांच्या ५० किलो वजनी गटात विनेशने अंतिम फेरी गाठली होती. मात्र सुवर्णपदकाच्या लढतीच्या दिवशी १०० ग्रॅम वजन जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे विनेशने निराश होत कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली. “प्रत्येक खेळाचे काही नियम असतात व त्याचा आपण आदर राखला पाहिजे. मात्र विनेशचे वजन अंतिम लढतीच्या दिवशी जास्त भरले. आदल्या दिवशी उपांत्य फेरीपर्यंत ती योग्य वजनात होती. त्यामुळे रौप्यपदक तिला मिळायलाच पाहिजे. तिला ते न मिळाल्यास कुस्तीच्या नियमांविषयी आयोजकांनी विचार करावा,” असे तेंडुलकरने ट्वीट केले. विनेशने कोणत्याही गैर मार्गाचा अवलंब न करता तिच्या कौशल्याच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांना नमवले. त्यामुळे ती रौप्यपदकाची नक्कीच हकदार आहे, असेही सचिन म्हणाला.
“विनेशवर ओढवलेली वेळ कुणावरही येऊ नये. ती भारताची तारांकित खेळाडू आहे. विनेशच्या न्यायालयीन लढाईविषी मी मत व्यक्त करू शकत नाही. मात्र तिला किमान रौप्यपदक मिळणे गरजेचे होते. माझा विनेशला पूर्ण पाठिंबा आहे,” असे हरभजन सिंग म्हणाला.