भारताच्या माजी क्रिकेटपटूचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू, पोलिसांना आत्महत्येचा संशय

वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी भारताकडून दोन कसोटी सामने खेळले होते. कर्नाटक रणजी संघाचं त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केलं.
भारताच्या माजी क्रिकेटपटूचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू, पोलिसांना आत्महत्येचा संशय

भारताचे माजी क्रिकेटपटू डेव्हिड जॉन्सन (वय ५२) यांचा आज चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. जॉन्सन यांनी त्यांच्या घराच्या बाल्कनीतून उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) च्या अधिकाऱ्यानं पीटीआयशी बोलताना सांगितलं की, "ते त्यांच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडले असल्याची माहिती आम्हाला मिळाली. त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं."

पोलिसांना आत्महत्येचा संशय-

कोथनूर पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉन्सन यांनी हेन्नूर येथील त्यांच्या घराच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची शक्यता आहे. कोठानूर पोलीस ठाण्यात UDR (अनैसर्गिक मृत्यू अहवाल) दाखल करण्यात आला आहे. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शामपुरा येथील आंबेडकर मेडिकल कॉलेजमध्ये नेण्यात आला आहे. दारूच्या व्यसनामुळे ते आजारी होते, असं पोलिसांनी सांगितलं. त्यांच्या पश्चात त्याची पत्नी व तीन मुले असा परिवार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये भारताचं प्रतिनिधित्व-

डेव्हिड जॉन्सन यांचा जन्म १६ ऑक्टोबर, १९७१ रोजी झाला. वेगवान गोलंदाज म्हणून त्यांनी भारताकडून दोन कसोटी सामने खेळले होते. १९९६ मध्ये त्याचं भारतीय क्रिकेट संघात पदार्पण झालं होतं. त्याचवर्षी त्यांनी दुसरा कसोटी सामनाही खेळला, परंतु नंतर त्यांना संधी मिळाली नाही. भारतासासाठी दोन कसोटी सामने खेळण्याव्यतिरिक्त जॉन्सन यांनी खूप काळ कर्नाटकसाठी रणजी क्रिकेट खेळले आणि दमदार कामगिरीदेखील केली.

खूप लवकर निघून गेलास 'बेनी'... : अनिल कुंबळे

डेव्हिड यांच्या मृत्यूची बातमी समोर येताच लोकांनी त्यांना सोशल मीडियावरून श्रद्धांजली वाहिली. जॉन्सन यांच्या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त करताना माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे यांनी एक्स (पूर्वीचे ट्वीटर) पोस्ट करत म्हटलं आहे की, "माझे क्रिकेट साथीदार डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झालं. त्यांच्या कुटुंबाप्रति संवेदना व्यक्त करतो. खूप लवकर निघून गेलास 'बेनी'...!"

माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर यानंदेखील डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनावर एक्स पोस्ट करत लिहिलं की, "डेव्हिड जॉन्सन यांच्या निधनामुळं मी दुःखी आहे. देव त्यांच्या कुटुंबियांना आणि नातेवाईकांना बळ देवो."

logo
marathi.freepressjournal.in