आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे निधन

दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात रुडी कोर्टझेन आणि इतर तिघांचा मृत्यू झाला
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे निधन
Published on

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे माजी पंच रुडी कोर्टझेन यांचे मंगळवारी निधन झाले. ते ७३ वर्षांचे होते. रुडी मूळचे दक्षिण आफ्रिकेचे होते. एका मोटार अपघातामध्ये रुडी याचा मृत्यू झाला, असे माध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे. क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी कोर्टझेन यांना श्रद्धांजली वाहिली.

माहितगारांनी सांगितले की, दक्षिण आफ्रिकेतील रिव्हरडेल नावाच्या परिसरात मंगळवारी सकाळी झालेल्या अपघातात रुडी कोर्टझेन आणि इतर तिघांचा मृत्यू झाला. या अपघातात गाड्यांची समोरासमोर टक्कर झाली. रुडी हे क्रिकेटमधील सर्वोत्तम पंचांपैकी एक होते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ३३१ सामन्यांमध्ये त्यांनी पंच म्हणून काम केले होते.

१९९२ मध्ये पोर्ट एलिझाबेथ येथे दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून त्यांनी आपली कारकीर्द सुरू केली होती. त्यांनी विक्रमी २०९ एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आणि १४ टी-२० सामन्यांमध्ये पंचाची जबाबदारी वाहिली होती. १९९९च्या विश्वचषकात इंग्लंड आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात ते पंच होते.

याशिवाय, २००३ आणि २००७च्या विश्वचषकांतील अंतिम सामन्यात ते ‘तिसरे पंच’ होते. २०१०मध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी सामन्यानंतर कोर्टझेन यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती.

कोर्टझेन यांच्या निधनानंतर क्रिकेट जगतातील अनेक मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागने भावूक होत ट्िवट करून कोर्टझेन यांच्या आठवणींना उजाळा दिला.

logo
marathi.freepressjournal.in