
मुंबई : मुंबईचे माजी रणजीपटू पद्माकर शिवलकर यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते.
डावखुरे फिरकीपटू शिवलकर यांना भारताकडून खेळण्याची संधी मिळाली नाही, मात्र रणजी स्पर्धेतील सर्वोत्तम फिरकीपटू म्हणून त्यांना ओळखले जायचे. त्या काळी भारतीय संघात फिरकीपटूंच्या स्थानासाठी जोरदार चुरस होती. क्रिकेट विश्वात शिवलकर हे ‘पॅडी’ नावाने लोकप्रिय होते. शिवलकर यांनी १९६१ ते १९८८ या काळात १२४ प्रथम श्रेणी सामन्यांत १९.६९च्या सरासरीने तब्बल ५८९ बळी मिळवले. वयाच्या २२व्या वर्षी पदार्पण करणाऱ्या शिवलकर यांनी चक्क ४८व्या वर्षापर्यंत खेळण्याचा पराक्रम केला. २०१७मध्ये शिवलकर यांना बीसीसीआयने कर्नल सी. के. नायुडू जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवले. निवृत्तीनंतर शिवलकर यांनी काळ मुंबईच्या संघाचे प्रशिक्षकपदही भूषवले. तसेच ते मुंबईच्या निवड समितीचे अध्यक्ष होते.
काही दिवसांपूर्वीच मुंबईचे अन्य माजी क्रिकेटपटू मिलिंद रेगे यांचेही निधन झाले. त्यानंतर आता शिवलकर यांच्या निधनामुळे मुंबईने आणखी एका ताऱ्याला गमावले, असे मत माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी नोंदवले. त्याशिवाय मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, वासिम जाफर, रवी शास्त्री यांनीही शिवलकर यांना आदरांजली वाहिली. काही दिवसांपूर्वीच वानखेडेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्यादरम्यान शिवलकर यांचा खास गौरव करण्यात आला होता.
“मुंबई क्रिकेटने आज एका महानायकाला गमावले. शिवलकर यांचे मुंबई क्रिकेटसाठी अमूल्य योगदान होते. मुंबईला लाभलेले ते सर्वोत्तम फिरकीपटू होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वराकडे प्रार्थना,” असे अजिंक्य नाईक म्हणाले. याव्यतिरिक्त, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शिवलकर यांना आदरांजली वाहिली.
हे महत्त्वाचे!
१९७२-७३च्या रणजी स्पर्धेतील अंतिम फेरीत शिवलकर यांनी तमिळनाडूविरुद्ध पहिल्या डावात १६ धावांत ८, तर दुसऱ्या डावात १८ धावांत ५ बळी मिळवले होते.
‘हा चेंडू दैवगतीचा’ हे शिवलकर यांनी लिहिलेले पुस्तक २०१९मध्ये प्रकाशित झाले होते. यामध्ये त्यांनी आयुष्यातील विविध प्रकरणांवर प्रकाश टाकला आहे.