ट्वेन्टी-२० मालिकेसाठी माजी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी १८ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला
 ट्वेन्टी-२० मालिकेसाठी माजी कर्णधार विराट कोहलीला विश्रांती
Published on

भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला अपेक्षेप्रमाणे वेस्ट इंडिजविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनचे भारतीय संघात पुनरागमन झाले असून युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला डच्चू देण्यात आला आहे. कोहलीव्यतिरिक्त आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा आणि फिरकीपटू यजुवेंद्र चहल यांनाही संघ व्यवस्थापनाने विश्रांती दिली आहे.

चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील राष्ट्रीय निवड समितीने गुरुवारी १८ खेळाडूंचा भारतीय संघ जाहीर केला. इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघ विंडीज दौऱ्यावर जाणार आहे. २२ जुलैपासून भारतीय संघ विंडीजविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळणार आहे. त्यानंतर २९ जुलैपासून उभय संघांतील पाच सामन्यांच्या ट्वेन्टी-२० मालिकेला प्रारंभ होईल. एकदिवसीय मालिकेसाठी यापूर्वीच संघ घोषित करण्यात आला असून शिखर धवन त्या संघाचे नेतृत्व करणार आहे. तर ट्वेन्टी-२० मालिकेसाठी मात्र रोहित पुन्हा एकदा संघाचे कर्णधारपद भुषवेल.

कोहलीने स्वत:च या मालिकेसाठी विश्रांती मागितली होती, असे बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याने सांगितले. त्याशिवाय भारताचा उपकर्णधार के. एल. राहुलचासुद्धा ट्वेन्टी-२० मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. परंतु त्याला त्यापूर्वी तंदुरुस्ती चाचणी पार करावी लागेल. कुलदीप यादवसाठीही हा नियम लागू असेल. आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेत उमरान छाप पाडण्यात अपयशी ठरल्याने त्याला संघातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल आणि डावखुरा अर्शदीप सिंग यांच्यावर वेगवान माऱ्याची भिस्त असेल.

दुसरीकडे गत‌वर्षी नोव्हेंबरमध्ये अखेरचा ट्वेन्टी-२० सामना खेळणाऱ्या अश्विनचे पुनरागमन झाले आहे. त्याला रवी बिश्नोई, रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल या फिरकीपटूंची साथ लाभेल.

logo
marathi.freepressjournal.in