इंडियन प्रीमियर लीगच्या फ्रँचायझीचा डंका

टी-२० लीगमध्ये पहिल्या हंगामामध्ये एकूण सहा संघ खेळविण्याची तयारी झाली आहे.
इंडियन प्रीमियर लीगच्या  फ्रँचायझीचा डंका

‘इंडियन प्रीमियर लीग’च्या धर्तीवर दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने प्रस्तावित केलेल्या टी-२० लीगमध्ये मुंबई इंडियन्सच्या मालकांनी केपटाऊनची फ्रँचायझी खरेदी केली आहे. क्रीडा क्षेत्राविषयी असलेल्या विधायक वचनबद्धतेचा एक भाग म्हणून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (आरआएल) या फ्रँचायझीचे स्वागत केले असून, मुंबई इंडियन्सचा ब्रॅण्ड पुढे नेण्यास आणि संयुक्त अरब अमिरातस्थित आंतरराष्ट्रीय टी-२० लीगचा संघही मिळविण्यास ही फ्रँचायझी सहाय्यकारक ठरेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. दरम्यान, पुढील वर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाणार आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने म्हटले आहे की, क्रिकेट फ्रँचायझींची मालकी, भारतातील फूटबॉल लीग, स्पॉन्सरशिप, कन्सलटन्सी, ॲथलीट टॅलेन्ट मॅनेजमेंट याद्वारे क्रीडाक्षेत्राला उत्तेजन देण्यात रिलायन्स इंडस्ट्रीजने नेहमीच महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली आहे.

या टी-२० लीगमध्ये पहिल्या हंगामामध्ये एकूण सहा संघ खेळविण्याची तयारी झाली आहे. या संघांची लिलाव प्रक्रिया संपली आहे. हे सर्वच्या सर्व सहा संघ आयपीएलमधील संघमालकांनी विकत घेतले आहेत. मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज, लखनऊ सुपर जायंट्स, सनरायझर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी दक्षिण आफ्रिकेतील टी-२० लीगमधील संघ विकत घेतले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालिका नीता अंबानी यांनी सांगितले की, रिलायन्स परिवारातील नव्या टी-२० संघाचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. भारताप्रमाणेच दक्षिण आफ्रिकेतही मनोरंजक क्रिकेट सादर करण्यास मुंबई इंडियन्स उत्सुक आहे. त्यामुळे आम्ही उत्साहित झालो आहोत.

रिलायन्स जिओचे अध्यक्ष आकाश अंबानी म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेतील या फ्रँचायझीमुळे आता तीन देशांत आमचे तीन संघ झाले आहेत. दंघ उभारणी करून चाहत्यांना सर्वोत्तम क्रिकेटची अनुभूती देण्यास मुंबई इंडियन्स ब्रॅण्ड आणि क्रिकेटमधील आमचे सखोल ज्ञान आणि प्रभुत्व उपयोगात आणण्यास आम्ही नेहमीच अग्रेसर आहोत.

मुंबई इंडियन्सच्या मालकांनी केपटाऊन; तर चेन्नई सुपर किंग्जच्या मालकांनी जोहान्सबर्गची फ्रँचायझी खरेदी केली आहे. लखनऊ सुपर जायंट्सच्या मालकांनी डरबन, दिल्ली कॅपिटल्सच्या मालकांनी प्रिटोरिया, राजस्थान रॉयल्सच्या मालकांनी पार्ल आणि सनरायझर्स हैदराबादच्या मालकांनी पोर्ट एलिझाबेथ फ्रँचायझी खरेदी केली आहे.

दरम्यान, दक्षिण आफ्रिका क्रिकेटचे संचालक आणि माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने सर्व फ्रँचायझींचे अभिनंदन आणि स्वागत केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, जानेवारी आणि फेब्रुवारी २०२३मध्ये होणाऱ्या दक्षिण आफ्रिकन लीगमध्ये आमच्या नवीन फ्रँचायझी मालकांचे स्वागत करताना आम्हाला आनंद होत आहे. दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटसाठी हा खरोखरच रोमांचक काळ आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in