वँगल्स (जर्मनी) : ग्रँडमास्टर डी. गुकेश याने जागतिक क्रमवारीत अग्रस्थानी असलेला नॉर्वेचा मॅग्नस कार्लसन आणि अर्मेनियाच्या लेवॉन अरोनियन याच्यासह विद्यमान जगज्जेता डिंग लिरेन याच्यावर मात करत वेसेनहॉस चेस चॅलेंज स्पर्धेत संयुक्तपणे दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.
पहिल्या दिवशीच्या सलामीच्या सामन्यात गुकेशला फ्रान्सच्या अलीरेझा फिरौझा याच्याकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर गुकेशने चारपैकी तीन गुणांची कमाई करत दमदार कामगिरीची नोंद केली. जर्मनीचा विन्सेन्ट केयमार ३.५ गुणांसह अग्रस्थानी आहे. नोदिरबेक अब्दुसातोरोव्ह हासुद्धा ३ गुणांनिशी गुकेशसह दुसऱ्या स्थानी आहे. कार्लसन, फिरौझा आणि अमेरिकेचा फॅबियानो कारुआना हे दोन गुणांसह संयुक्तपणे चौथ्या स्थानी आहेत.
जलद पद्धतीने खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत गुकेशची सर्वोत्तम कामगिरी कार्लसनविरुद्ध झाली. गुकेशने मिळालेल्या संधीचा फायदा उठवत कार्लसनला पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. कार्लसनला मात्र आपल्या सर्वोत्तम खेळावर लक्ष केंद्रित करता आले नाही.