

मुंबई : शरीरसौष्ठवपटूंच्या स्वप्नातील मानाचा किताब मानल्या जाणाऱ्या 'मुंबई श्री' स्पर्धेत यंदा बॉडी वर्कशॉप जिमचा गणेश पेडामकरने अखेर विजेतेपदावर आपले नाव कोरले. अनेक वर्षांच्या अथक परिश्रमांना आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांना यंदा यश लाभत त्याने मुंबई श्रीचा मान पटकावला. महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदे हिने अपेक्षेप्रमाणे बाजी मारत आपले वर्चस्व कायम राखले. गणेश पेडामकरसाठी हा विजय अत्यंत खास ठरला. यापूर्वी तो एकदा गटविजेता आणि एकदा कांस्यपदक विजेता ठरला होता; मात्र मुंबई श्रीचे जेतेपद त्याच्या हातातून निसटत होते. अपयशाने खचून न जाता त्याने प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर चौथ्या प्रयत्नात त्याच्या मेहनतीचे चीज झाले आणि मुंबई शरीरसौष्ठवाचे 'ऑस्कर' मानल्या जाणाऱ्या मुंबई श्री किताबावर त्याने मोहोर उमटवली. चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्सच्या अंतिम फेरीत आठही गटविजेते रंगमंचावर उतरले तेव्हा प्रेक्षकांचे लक्ष गणेश पेडामकर, मनीष वाघेला, अक्षय खोत आणि चेतन नाईक यांच्याकडे लागले होते. या सर्व तगड्या प्रतिस्पर्ध्यामध्ये गणेशचा पीळदार देहयष्टी, उंची आणि स्नायूंचे संतुलित आकार विशेष उठून दिसत होते. त्याच्या आखीवरेखीव शरीरयष्टीने आणि प्रभावी पोझिंगने परीक्षकांना प्रभावित करत अन्य प्रतिस्पध्र्थ्यांना मागे टाकत जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.
मोठ्या संख्येने खेळाडूंनी सहभाग घेतल्यामुळे प्रत्येक गट अत्यंत चुरशीचा ठरला. गटविजेत्यांची निवड करताना निर्णायकांनाही चांगलाच कस लागला. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा माजी खासदार गजानन कीर्तीकर, नगरसेवक सिद्धांत शर्मा, विजय भोसले, मुंबई अध्यक्ष अजय खानविलकर, सरचिटणीस राजेश सावंत यांच्या उपस्थितीत पार पडला. या स्पर्धेतून मुंबई आणि उपनगर संघाची निवड करण्यात आली असून हा संघ १५ मार्च २०२६ रोजी पनवेल येथे होणाऱ्या महाराष्ट्र श्री स्पर्धेत सहभागी होणार आहे.
महिलांमध्ये विजेतेपदासाठी चुरस
अलिकडच्या काळात महिलांमध्येही फिटनेस आणि शरीरसौष्ठवाची आवड वाढताना दिसत आहे. त्यामुळे महिलांच्या स्पर्धांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. यंदाच्या स्पर्धेत बॉडी फिटनेस जिमच्या रेखा शिंदेने दुर्गा कुमारी आणि लविना नरोन्हा यांच्या आव्हानावर मात करत प्रथम क्रमांक पटकावला. तिच्या सशक्त देहयष्टीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांचीही मने जिंकली.