कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने रोहित-विराटची पाठराखण केली असून ते दोघेही २०२७चा विश्वचषक नक्कीच खेळतील, अशी आशा व्यक्त केली आहे.
“रोहित-विराटने एकदिवसीय प्रकारात सातत्याने वर्चस्व गाजवले आहे. २०२३चा एकदिवसीय विश्वचषक व २०२५ची चॅम्पियन्स ट्रॉफी या दोन्ही आयसीसी स्पर्धांमध्ये त्यांनी निर्णायक वेळी धावा केल्या. त्यामुळे पुढील दीड वर्षात सामन्यांची योग्य निवड करून रोहित-विराटने फॉर्म टिकवला, तर त्यांच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही,” असे गांगुली म्हणाला.
त्याशिवाय सप्टेंबरमध्ये रंगणाऱ्या आशिया चषकापूर्वी भारतीय खेळाडूंना विश्रांती देण्याच्या निर्णयाचे गांगुलीने कौतुक केले आहे. “इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटींनंतर नक्कीच संघातील खेळाडूंची शारीरिक व मानसिक दमछाक झाली असेल. या मालिकेतील काही खेळाडू भारताच्या टी-२० संघाचाही भाग आहेत. त्यामुळे बीसीसीआयने ऑगस्ट महिन्यात आणखी एखादी मालिका न खेळवणे, हे नक्कीच खेळाडूंसाठी फलदायी आहे,” असे गांगुली म्हणाला. तसेच त्याने भारताच्या कसोटी कर्णधार शुभमन गिलवरही स्तुतिसुमने उधळली.