‘लिजेंड्स लीग क्रिकेट' सामन्यासाठी गांगुली घेणार नाही मानधन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले विविध देशांचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील.
‘लिजेंड्स लीग क्रिकेट' सामन्यासाठी गांगुली घेणार नाही मानधन

येत्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या ‘लिजेंड्स लीग क्रिकेट’ (एलएलसी) स्पर्धेच्या दुसऱ्या सत्रात स्पर्धा सुरू होण्याच्या एक दिवस आधी १६ सप्टेंबर रोजी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त होणाऱ्या खास सामन्यात मानधन न घेण्याचा निर्णय भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी घेतला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारलेले विविध देशांचे खेळाडू या स्पर्धेत खेळताना दिसतील. लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी माहिती दिली की, कोलकातातील ईडन गार्डन्स किक्रेट स्टेडियमवर ‘इंडिया महाराजाज’ आणि ‘वर्ल्ड जायंट्स’ या दोन संघादरम्यान एक विशेष सामना खेळविला जाईल. ‘इंडिया महाराजाज’ संघाचे नेतृत्व सौरव गांगुली करणार आहे. प्रतिस्पर्धी संघाचे नेतृत्व विश्वचषक विजेता कर्णधार इऑन मॉर्गनकडे असणार आहे.

रहेजा पुढे म्हणाले की, “भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाल्यानिमित्त हा विशेष सामना होणार आहे. त्यामुळे आम्ही या सामन्याला चॅरिटी मॅच म्हणणार नाही.”

माजी कर्णधाराच्या सहभागाबाबत आक्षेप

दरम्यान, लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये सौरव गांगुलीच्या सहभागावरून वाद निर्माण झाला आहे. ‘अ‍ॅक्टिव्ह फोरम फॉर जस्टिस’ नावाच्या संघटनेने लीगमधील भारताच्या माजी कर्णधाराच्या सहभागाला आक्षेप घेतला होता. या संघटनेने बीसीसीआय सचिव जय शाह यांना याबाबत एक ईमेल पाठविला होता.

ईमेलमध्ये म्हटले होते की, “बीसीसीआय एक ट्रस्ट आहे. सौरव गांगुली या ट्रस्टचे अध्यक्ष आहेत. असे असताना गांगुली लिजेंड्स लीग क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी पैसे कसे आकारू शकत नाहीत. शिवाय लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनाही २०१९मध्ये आर्थिक अनियमिततेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने ‘ब्लॅक लिस्ट’ केले होते” यामुळे आता लीगचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमण रहेजा यांनी सौरव गांगुली भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त होणाऱ्या सामन्यात पैसे घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in