कम्फर्ट झोनमधून बाहेर या! मुख्य प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय खेळाडूंना सल्ला

कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि खेळ उंचावून आगामी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघातील खेळाडूंना दिला. दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या अनुपस्थितीत जबाबदारीने खेळा असे गंभीर म्हणाले.
कम्फर्ट झोनमधून बाहेर या! मुख्य प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय खेळाडूंना सल्ला
Published on

बेकनहॅम : कम्फर्ट झोनमधून बाहेर या आणि खेळ उंचावून आगामी इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका अविस्मरणीय बनवण्याचा प्रयत्न करा, असा सल्ला भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी संघातील खेळाडूंना दिला. दिग्गज खेळाडू विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन यांच्या अनुपस्थितीत जबाबदारीने खेळा असे गंभीर म्हणाले.

वर्ष २००७ नंतर इंग्लंडमध्ये पहिल्या मालिका विजयाच्या शोधात भारतीय संघ आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला २० जूनपासून लिड्स येथे सुरुवात होणार आहे.

या मालिकेकडे दोन दृष्टिकोनातून पाहिले जाते. एक म्हणजे तीन दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत ही मालिका होणार आहे आणि देशासाठी काहीतरी विशेष करण्याची संधी आहे, असे गंभीर म्हणाले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवीचंद्रन अश्विन या तीन खेळाडूंनी नुकतीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्या पार्श्वभूमीवर गंभीर यांनी हे वक्तव्य केले.

शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंचा भरणा असलेल्या संघात उत्साह दिसत आहे. कम्फर्ट झोनमधून आपण बाहेर आलो आणि प्रत्येक चेंडूवर लढलो तर आपण हा दौरा संस्मरणीय ठरवू शकू, असे गंभीर म्हणाले.

इंग्लंड दौऱ्यावर आलेल्या भारतीय संघाचे गंभीर यांनी स्वागत केले. साई सुदर्शनसह भारतीय संघातील काही खेळाडूंबाबत त्यांनी कौतुकोद्गार काढले.

पहिला कसोटी सामना हा कायमच खास असतो. साईला या मालिकेसाठी शुभेच्छा आहेत. गेल्या तीन महिन्यांत त्याने आपल्या बॅटने शानदार कामगिरी केली आहे. पांढऱ्या चेंडूवर अर्शदिप सिंग चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे मला आशा आहे की लाल चेंडूवरही तो प्रभावी गोलंदाजी करू शकतो, असे गंभीर म्हणाले.

कर्णधार शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्याबाबत बोलताना गंभीर म्हणाले की, पहिल्यांदाच भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याबद्दल गिलचे अभिनंदन. ऋषभ पंतचेही अभिनंदन. भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या गटाचा पंत हा एक भाग आहे.

गंभीर यांनी करुण नायरचेही विशेष कौतुक केले. नायरने तब्बल सात वर्षांनंतर भारतीय संघात पुनरागमन केले. आहे. नायरबद्दल बोलताना गंभीर म्हणाले की, पुनरागमन करणे हे कधीच सोपे नसते. गेल्या वर्षभरात तू केलेली कामगिरी खूपच जबरदस्त होती. जमवलेल्या धावा आणि कधीही हार न मानण्याची वृत्ती यामुळे तू संघात परत आला आहेस, असे गंभीर म्हणाले.

भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असून २० जूनपासून या दोन्ही संघांमध्ये ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. दिग्गज खेळाडूंच्या अनुपस्थितीत प्रथमच भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर जात आहे. संघात काही अननुभवी खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. इंग्लंडच्या अनुभवी संघासमोर दोन हात करण्याचे आव्हान भारतासमोर आहे. त्यामुळे या मालिकेवर क्रीडा जगताचे लक्ष लागले आहे. नवा कर्णधार शुभमन गिलच्या नेतृत्वाची या मालिकेत परीक्षा असल्याचे बोलले जाते.

दबावाखाली खेळण्याचा सराव आवश्यक - गिल

सामन्यादरम्यान दबावाचा सामना करता यावा यासाठी नेटमध्ये दबावाखाली खे‌ळण्याचा सराव करूया. मैदानात टिकून राहण्यासह दबावाखाली गोलंदाजी आणि फलंदाजी करण्याचा सराव करूया, असे संघाचा कर्णधार शुभमन गिल म्हणाला.

logo
marathi.freepressjournal.in