

मायदेशात खेळलेल्या कसोटीत कधी नव्हे असा लाजिरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या टीम इंडियाच्या गचाळ कामगिरीमुळे गुवाहाटीतील प्रेक्षक चांगलचे नाराज झालेले दिसले. सामना संपल्यानंतर संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरला प्रेक्षकांच्या रोषाचा सामना करावा लागला. सामन्यानंतर पारितोषिक वितरणासाठी भारतीय संघ मैदानात जात असताना दारूण पराभवामुळे चिडलेल्या प्रेक्षकांनी 'गौतम गंभीर हाय, हाय', 'गंभीर गो-बॅक' असे नारे देण्यास सुरूवात केली. या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.
नेमकं काय झालं?
गुवाहाटीच्या बरसापारा स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेकडून तब्बल ४०८ धावांनी मानहानीकारक पराभव झाल्यानंतर मैदानात उपस्थित काही भारतीय प्रेक्षक प्रचंड चिडले. त्यांनी गौतम गंभीरला लक्ष्य केले. पारितोषिक वितरणासाठी टीम इंडियाचे खेळाडू मैदानावर येताच प्रेक्षकांच्या एका गटाकडून खेळाडूंसमोरच गंभीरविरोधात घोषणाबाजी सुरू झाली. 'गौतम गंभीर हाय हाय', गंभीर गो-बॅक अशा घोषणा देत गंभीरची हूटींग सुरू झाली. गंभीरने एक नजर प्रेक्षकांच्या त्या गटाकडे रोखली पण नंतर दुर्लक्ष केलं. तरीही प्रेक्षकांची घोषणाबाजी सुरूच होती. त्यानंतर गंभीरच्या जवळच असलेल्या मोहम्मद सिराजने प्रेक्षकांकडे बघून त्यांना शांत राहण्याचा इशारा केला. तोंडावर बोट ठेवून तो प्रेक्षकांना घोषणा न देण्यास सांगत होता. घोषणाबाजी वाढल्यानंतर अखेर संघाचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक सीमारेषेजवळ पोहोचले आणि त्यांना प्रेक्षकांना शांत राहण्याची विनंती करावी लागली. सोशल मीडियावर घटनेचा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून त्याखाली नेटकरी व्यक्त होत आहेत.
टीम इंडियाची 'गंभीर' स्थिती
एकूणच गंभीरच्या प्रशिक्षणावर सध्या चोहीकडून टीकेचा वर्षाव होत आहे. त्याच्या कार्यकाळात भारताने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत नांग्या टाकल्याच पण ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका गमावली. फक्त बांगलादेश व वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे आता बीसीसीआय कसोटी प्रकारात गंभीरकडून प्रशिक्षकपद काढून घेणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.