
लंडन : भारत-इंग्लंड यांच्यातील पाचवी कसोटी सुरू होण्यासाठी अवघ्या एका दिवसाचा अवधी शिल्लक असतानाच एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. मंगळवारी सरावादरम्यान भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि ओव्हल स्टेडियमचे पिच क्युरेटर ली फोर्टिस यांच्यात खेळपट्टीवरून खडाजंगी झाल्याचे समोर आले. त्यामुळे आता याप्रकरणी कुणावर कारवाई करण्यात येणार का, हे पाहणे रंजक ठरेल.
भारत-इंग्लंड यांच्यात सध्या पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. इंग्लंडचा संघ या मालिकेत २-१ असा आघाडीवर आहे. ३१ जुलैपासून उभय संघांत पाचवी कसोटी सुरू होणार आहे. त्यापूर्वी मंगळवारी दुपारी भारतीय संघ सरावासाठी आला असता गंभीर व फोर्टिस यांच्यात वाद झाल्याचे समजते. नियमानुसार संघ व्यवस्थापनातील सदस्यांना खेळाडूंच्या आधी खेळपट्टी पाहण्यास मिळते. त्याचवेळी फोर्टिस यांनी संघ व्यवस्थापनातील एका सदस्याला उद्देशून काहीतरी म्हटल्याचे समजते. त्यानंतर गंभीर काय म्हणाला, याची चित्रफीतही समाज माध्यमांवर व्हायरल झाली आहे.
भारताचे फलंदाजी प्रशिक्षक सितांशू कोटक यांनी पत्रकार परिषदेत याविषयी सविस्तर माहिती दिली. “जेव्हा आम्ही खेळपट्टी पाहण्यासाठी गेलो, तेव्हा फोर्टिस यांनी आम्हाला खेळपट्टी पाहून २.५ मीटर दूर उभे राहण्यास सांगितले. खेळपट्टीभोवती बांधलेल्या दोरीच्या चौकटीबाहेरूनच खेळपट्टी पाहावी, असे तो म्हणाला. मात्र हे अनाकलनीय होते,” असे कोटक यांनी सांगितले.
“कोणत्याही प्रशिक्षकासह खेळाडूंना जर त्यांनी स्पाईक शूज घातलेले नसतील, तर खेळपट्टीच्या जवळ येण्याचा किंवा त्यावर चालण्याचाही अधिकार असतो. आमच्यापैकी कोणीही स्पाईकचे शूज घातलेले नव्हते. तसेच एका सदस्याने खेळपट्टीजवळच बर्फाचा बॉक्स ठेवल्याने त्यावरून फोर्टिस यांनी तक्रार केली,” असेही कोटक यांनी नमूद केले.
“या लढतीसाठी ओव्हलला येण्यापूर्वीच येथील पिच क्युरेटरचा स्वभाव व बोलण्याची वृत्ती ठिक नसल्याचे आम्हाला काहींनी सांगितले होते. आम्हाला सरावासाठी देण्यात आलेली खेळपट्टी व मुख्य खेळपट्टी यामध्ये फरक असल्याने मुख्य खेळपट्टी जवळून पाहण्याचा आम्हाला अधिकार आहे,” असेही कोटक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पिच क्युरेटर फोर्टिस यासंबंधी सामनाधिकारी किंवा इंग्लंड क्रिकेट मंडळाकडे तक्रार करणार असल्याचे समजते. मात्र भारतीय संघही मागे हटणार नाही. तसेच काही दिवसांपूर्वीचाच फोर्टिस आणि इंग्लंडचा मुख्य प्रशिक्षक ब्रँडन मॅक्युलम यांचा खेळपट्टीवर उभे राहून संवाद साधतानाचे छायाचित्र वायरल होत आहे. यावरून काहींनी इंग्लंडच्या दुटप्पीपणावर निशाणा साधला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण आणखी किती काळ रंगणार, याकडे सर्वांचे लक्ष असेल.
दरम्यान, आयसीसीने २०१९पासून जागतिक कसोटी अजिंक्यपद (वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप) स्पर्धा सुरू केली. तेव्हापासून भारताने दोन वेळेस म्हणजेच २०२१ व २०२३च्या अंतिम फेरीत धडक मारली होती. मात्र दोन्ही वेळेला भारताला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५मध्ये मात्र भारताला अंतिम फेरीही गाठता आली नाही. त्यामुळे आता युवा शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे.
गिल-गंभीर पर्वाची सुरुवात पराभवाने झाली. लीड्स येथे इंग्लंडने भारताला धूळ चारली. मग एजबॅस्टन येथे भारताने पलटवार करताना मालिकेत बरोबरी साधली. तिसऱ्या कसोटीत भारताने साऊथहॅम्पटन येथे अवघ्या २२ धावांनी पराभव पत्करला. मँचेस्टर येथील चौथ्या कसोटीत मग भारताने दुसऱ्या डावात तब्बल पाच सत्र फलंदाजी करून लढत अनिर्णित राखली. गिल, सुंदर व जडेजा यांनी दमदार शतके झळकावली. त्यामुळे उभय संघांतीलल पाच सामन्यांच्या मालिकेत सध्या इंग्लंडचा संघ २-१ असा आघाडीवर आहे. भारताने आजवर कोणत्याही मालिकेत २-१ अशा पिछाडीवर असताना मालिका बरोबरीत सोडवलेली नाही. त्यामुळे भारतीय संघ यावेळी विक्रम रचणार का, याकडेही सर्वांचे लक्ष असेल.
इंग्रजीचा पेपर भारतासाठी नेहमीच कठीण गेला आहे. भारताने आजवर फक्त तीनदाच इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकली आहे. २००७मध्ये भारताने राहुल द्रविडच्या नेतृत्वात येथे अखेरची मालिका जिंकली. यावेळी भारताला १८ वर्षांनी इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याची संधी होती. मात्र तूर्तास भारताला किमान मालिका बरोबरीत सोडवण्याची संधी आहे. इंग्लंडने या कसोटीसाठी जेमी ओव्हर्टनला आपल्या चमूत स्थान दिले आहे.
गंभीर नेमके काय म्हणाला?
“तू फक्त एक पिच क्युरेटर आहेस. आम्हालाही खेळपट्टीला कोणत्या कारणामुळे धोका निर्माण होईल, हे ठाऊक आहे. त्यामुळे तू आम्हाला शिकवू नकोस. तुला तो अधिकार नाही. तुला याविषयी सामनाधिकाऱ्यांकडे तक्रार करायची असल्यास करू शकतो. मात्र माझ्या संघातील सदस्याला ओरडून बोलण्याचा तुला अधिकार नाही,” असे गंभीर इंग्रजीत म्हणाल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. ओव्हलची खेळपट्टी कौंटी स्पर्धेत सरेचा संघ वापरतो. पाच दिवस ही खेळपट्टी उत्तम टिकून रहावी म्हणून फोर्टिस यांनी भारताच्या सदस्यांना फार जवळ न येण्याचे सांगितले असेल, अशी चर्चादेखील सुरू आहे. मात्र त्यांनी भारतीय संघातील कोणत्या सदस्यावर आवाज उठवला, हे अद्याप समजलेले नाही. तसेच गंभीरने त्यांना हातवारे केले, त्यावेळी फोर्टिस यांनी काय प्रत्युत्तर दिले, हेदेखील अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताचे सर्व गोलंदाज तंदुरुस्त
तारांकित वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमरा पाचव्या कसोटीत खेळेल की नाही, हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र गंभीरने आपले सर्व वेगवान गोलंदाज खेळण्यास तंदुरुस्त आहेत, असे सांगितले. आकाश दीप व अर्शदीप सिंग दुखापतीमुळे चौथ्या कसोटीला मुकले. मात्र मंगळवारी ते सराव करताना आढळले. त्यामुळे भारतीय संघाची चिंता काहीशी कमी झाली आहे. फिरकीपटू कुलदीप यादवला किमान पाचव्या कसोटीत तरी संधी मिळणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल. रवींद्र जडेजा व वॉशिंग्टन सुंदर या फिरकीपटूंचे संघातील स्थान मात्र कायम राहील, अशी अपेक्षा आहे.