दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाण्या 'व्हाइटवॉश'नंतर कोच गंभीर बॅकफूटवर; म्हणाला - "मला प्रशिक्षकपदी कायम..."

गंभीरच्या प्रशिक्षणावर सध्या चोहीकडून टीकेचा वर्षाव होत आहे. त्याच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका गमावली. फक्त बांगलादेश व वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे आता बीसीसीआय कसोटी प्रकारात गंभीरकडून प्रशिक्षकपद काढून घेणार का...
दक्षिण आफ्रिकेकडून लाजिरवाण्या 'व्हाइटवॉश'नंतर कोच गंभीर बॅकफूटवर; म्हणाला - "मला प्रशिक्षकपदी कायम..."
Published on

गुवाहाटी : भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरने कसोटी संघाच्या कामगिरीवर निराशा व्यक्त करतानाच खेळाडूंची पाठराखण केली. तसेच हा काळ स्थित्यंतराचा असल्याचे मत व्यक्त केले. गंभीरच्या प्रशिक्षण कारकीर्दीत भारताने मायदेशात दुसरी मालिका गमावली. २०२४मध्ये न्यूझीलंडविरुद्धही भारताला व्हाइटवॉश पत्करावा लागला होता. त्यामुळे गंभीरला प्रशिक्षकपदाविषयी प्रश्न विचारण्यात आले, यावेळी गंभीर 'बॅकफूट'वर गेल्याचे दिसले.

“प्रशिक्षकपदी मला कायम ठेवायचे की नाही, याचा निर्णय बीसीसीआय घेईल. माझ्यासाठी संघ महत्त्वाचा आहे. मी प्रशिक्षक असणे किंवा नसणे नाही,” असे गंभीर म्हणाला. “लोक नेहमीच न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेविषयी चर्चा करत बसतात. मात्र माझ्या कार्यकाळात आम्ही इंग्लंडला बरोबरीत रोखले. तसेच चॅम्पियन्स ट्रॉफी व आशिया चषक जिंकला, याकडे कोणाचे लक्ष जात नाही. हा संघ सध्या स्थित्यंतराच्या काळात आहे. मला हा शब्द वापरणे आवडत नाही. मात्र हे मान्य करावे लागेल” असेही गंभीरने सांगितले.

“या संघातील आठपैकी पाच फलंदाज हे कारकीर्दीत १० ते १५ कसोटी सामनेसुद्धा खेळलेले नाहीत. त्यामुळे त्यांना अनुभव मिळण्यासाठी वेळ लागेल. आम्ही निश्चित लौकिकाला साजेशी कामगिरी केलेली नाही. मात्र यामुळे खेळाडूंना धारेवर घेणे चुकीचे ठरेल. त्यांनाही चुकातून शिकण्याची संधी दिली पाहिजे,” असेही गंभीरने नमूद केले. १ बाद ९५ वरून ७ बाद १२२ अशी घसरण होणे लज्जास्पद आहे. यातून फलंदाजांनी बोध घेणे गरजेचे आहे, असेही गंभीरने सांगितले.

एकूणच गंभीरच्या प्रशिक्षणावर सध्या चोहीकडून टीकेचा वर्षाव होत आहे. त्याच्या कार्यकाळात भारताने ऑस्ट्रेलियातही कसोटी मालिका गमावली. फक्त बांगलादेश व वेस्ट इंडिजविरुद्ध भारताने कसोटी मालिका जिंकली. त्यामुळे आता बीसीसीआय कसोटी प्रकारात गंभीरकडून प्रशिक्षकपद काढून घेणार का, हे पाहणे रंजक ठरणार आहे. भारताची पुढील कसोटी मालिका थेट ऑगस्ट २०२६मध्ये रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in