डाव्या-उजव्यांचा प्रयोग चॅम्पियन्स ट्रॉफीतही कायम! गंभीरचे स्पष्ट मत; श्रेयसला संघातून वगळण्याच्या अफवांना धुडकावले

भारतीय संघ यापुढेही डाव्या-उजव्या फलंदाजांचा क्रम कायम राखण्यास प्राधान्य देईल. कारण संघात कोणता फलंदाज सामन्याच्या स्थितीनुसार कोणत्या स्थानी अधिक प्रभाव पाडू शकतो, याला महत्त्व आहे, अशा शब्दांत भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट मत मांडले.
डाव्या-उजव्यांचा प्रयोग चॅम्पियन्स ट्रॉफीतही कायम! गंभीरचे स्पष्ट मत; श्रेयसला संघातून वगळण्याच्या अफवांना धुडकावले
Published on

अहमदाबाद : भारतीय संघ यापुढेही डाव्या-उजव्या फलंदाजांचा क्रम कायम राखण्यास प्राधान्य देईल. कारण संघात कोणता फलंदाज सामन्याच्या स्थितीनुसार कोणत्या स्थानी अधिक प्रभाव पाडू शकतो, याला महत्त्व आहे, अशा शब्दांत भारताचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने स्पष्ट मत मांडले. त्याशिवाय मुंबईकर श्रेयस अय्यरला संघातून वगळण्याच्या अफवानांही गंभीरने धुडकावून लावले.

भारत-इंग्लंड यांच्यातील एकदिवसीय मालिका नुकतीच पार पडली. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने या मालिकेत ३-० असे निर्भेळ यश संपादन केले. मात्र या मालिकेतील पहिल्याच सामन्यात श्रेयस खेळणार नव्हता, असे समजते. यशस्वी जैस्वाल व रोहित सलामीला, तर शुभमन गिल तिसऱ्या व विराट कोहली चौथ्या स्थानी फलंदाजी करणार होता. परंतु विराट जायबंदी झाल्याने श्रेयसला संधी मिळाली. श्रेयसने या संधीचा लाभ उचलून अर्धशतक झळकावले. स्वत: श्रेयसनेच अजाणतेपणे याविषयी माहिती दिली. श्रेयसने तिन्ही सामन्यांत मिळून २ अर्धशतकांसह १८१ धावा केल्या. तसेच चौथ्या क्रमांकावर आपणच योग्य असल्याचे दाखवून दिले.

“यशस्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून उत्तम लयीत होता. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी त्याला एकदिवसीय प्रकारात पदार्पण देणे गरजेचे होते. त्यामुळेच फक्त एका लढतीसाठी यशस्वीला संधी देण्यात आली. श्रेयसच्या संघातील स्थानाला कोणताही धोका नव्हता किंवा त्याला संपूर्ण मालिकेत संघाबाहेर करण्याचा विचारही कोणी केला नाही. चॅम्पियन्स ट्रॉफीतही तो चौथ्या स्थानी संघासाठी फलंदाजी करेल,” असे ४३ वर्षीय गंभीर म्हणाला. यशस्वीला भविष्यात आणखी संधी लाभतील. मात्र तूर्तास त्याची १५ खेळाडूंत गरज भासली नाही. त्यामुळेच यशस्वीला राखीव खेळाडूंत ठेवण्यात आले, असेही गंभीरने नमूद केले.

“संघातील पहिल्या चार फलंदाजांचा क्रम निश्चित आहे. मात्र गरज पडल्यास सामन्याच्या स्थितीनुसार चौथ्या क्रमांकावरही एखादा डावखुरा फलंदाज येऊ शकतो. पहिले पाच अथवा सहा फलंदाज उजवेच असावेत, असा कुठेही नियम नाही. अक्षर, जडेजा, सुंदर यांच्यात वरच्या क्रमांकावर फलंदाजी करून सामन्यात प्रभाव पाडण्याची किंवा सामन्याला कलाटणी देण्याची क्षमता आहे. अक्षरने इंग्लंडविरुद्ध दोन सामन्यांत ते करूनही दाखवले. त्यामुळे डाव्या-उजव्यांचा प्रयोग यापुढेही कायम असेल,” असेही गंभीरने सांगितले.

१९ फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेत भारताची अनुक्रमे बांगलादेश, पाकिस्तान, न्यूझीलंड या संघांशी गाठ पडेल. भारताचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.

राहुलच यष्टीरक्षणासाठी प्रथम पसंती

इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांपैकी दोन लढतींमध्ये के. एल. राहुलने सहाव्या, तर तिसऱ्या सामन्यात पाचव्या स्थानी फलंदाजी केली. मात्र त्याला तिन्ही लढतींमध्ये मिळून फक्त ५२ धावाच करता आल्या. तसेच यष्टीरक्षणातही राहुलने फारशी छाप पाडली नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीत ऋषभ पंतला प्रथम संधी मिळणार का, असे विचारले असता गंभीरने नकार दिला. संघ व्यवस्थापनाने राहुलवर विश्वास दर्शवला असून चॅम्पियन्स ट्रॉफीतसुद्धा यष्टीरक्षक म्हणून पहिल्या त्यालाच प्राधान्य देण्यात येईल, असे स्पष्ट केले.

खेळाडूंच्या कुटुंबीयांना दुबईत जाण्यास मनाई

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय खेळाडूंसह त्यांच्या कुटुंबीयांना दुबईत जाता येणार नाही. बीसीसीआयने जाहीर केलेल्या नव्या नियमांची चॅम्पियन्स ट्रॉफीपासून अंमलबजावणी करण्यात येणार आहे. यासाठी खेळाडूंच्या पत्नी, मुले यांना संघासह प्रवास करण्यास अथवा खेळाडूंच्या हॉटेलमध्ये राहण्यास मनाई आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी २० दिवस रंगणार आहे. जर एखाद्या खेळाडूच्या कुटुंबीयांना दुबईत जायचे असल्यास त्यांच्या राहण्याचा खर्च खेळाडूलाच पाहावा लागणार आहे. मात्र त्या खेळाडूला आपल्या पत्नी अथवा मुलांना भेटता येणार नाही. तसेच खेळाडूंना स्पर्धेदरम्यानही मैदानात अथवा मैदानाबाहेर कुटुंबीयांना भेटता येणार नाही.

logo
marathi.freepressjournal.in