गौतम गंभीर मायदेशी परतले; आईला हृदयविकाराचा झटका?
बेकनहॅम : इंग्लंड दौऱ्यावर असलेले भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर हे शुक्रवारी भारतात परतले. आई सीमा गंभीर यांची प्रकृती बिघडल्याने गौतम गंभीर मायदेशी परतल्याचे बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
सीमा गंभीर यांना हृदयविकाराचा झटका आला असून दिल्लीतील रुग्णालयात आयसीयूमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असल्याने गंभीर परतल्याचे सूत्रांनी सांगितले.
गंभीर यांच्या आईला बुधवारी हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे गौतम गंभीर आणि त्यांचे कुटुंब गुरुवारी भारतासाठी रवाना झाले आणि शुक्रवारी दिल्लीत पोहचल्याचे सूत्रांनी सांगितले.
गंभीर यांच्या आईची तब्बेत सुधारते आहे, मात्र अजूनही त्या आयसीयूमध्येच आहेत. सर्वकाही ठिकठाक झाले तर २० जूनपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी गंभीर इंग्लंडला रवाना होतील, अशी माहिती मिळते. गंभीर यांच्या अनुपस्थितीत सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट संघाला मार्गदर्शन करतील.