भारताने पाकिस्तानशी कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळू नये : गंभीर

माझ्या हाती असते, तर मी भारताचा पाकिस्तानशी कोणत्याही स्पर्धेत एकही सामना होऊ दिला नसता,” असे गंभीर म्हणाला.
भारताने पाकिस्तानशी कोणत्याही क्रिकेट स्पर्धेत खेळू नये : गंभीर
Published on

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने सध्या सुरू असलेल्या मुद्द्यावर स्पष्ट भाष्य केले आहे. भारताने पाकिस्तानशी कोणत्याही स्पर्धेत अथवा कोणत्याही ठिकाणी क्रिकेट खेळू नये, असे गंभीर म्हणाला आहे.

आयपीएल सुरू असल्याने गंभीर सध्या सुट्टीवर असून आपल्या कुटुंबासह दिल्लीत वेळ घालवत आहे. पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताच्या २६ निष्पाप जणांचा बळी गेला. या हल्ल्यामागे पाकिस्तानचा हात असल्याचे जगजाहीर आहे. त्याच पार्श्वभूमीवर एका कार्यक्रमात गंभीरने त्याचे मत मांडले.

“हा निर्णय शासनाचा आहे. मात्र आपल्या देशवासियांच्या प्राणापेक्षा महत्त्वाचे काही नाही. देशाची सुरक्षा आणि आपले सैनिक यांना आपले नेहमीच पहिले प्राधान्य असले पाहिजे. त्यामुळे माझ्या हाती असते, तर मी भारताचा पाकिस्तानशी कोणत्याही स्पर्धेत एकही सामना होऊ दिला नसता,” असे गंभीर म्हणाला.

“सामने होत राहतील, चित्रपट येत राहतील. मात्र यामुळे देशाचे नाव खराब होणार नाही, याकडे लक्ष दिले पाहिले. त्यामुळे पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारचे संबंध न ठेवणे आपल्यासाठी हिताचे ठरेल. त्यांच्याशी क्रिकेट न खेळल्याने आपले काहीही नुकसान होणार नाही,” असेही गंभीरने नमूद केले. तसेच इंग्लंडविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी संघनिवडीत प्रशिक्षकाचा हात नसेल. हा निर्णय सर्वस्वीपणे निवड समितीचा असतो, असेही त्याने सांगितले.

आयपीएल ठरल्याप्रमाणे सुरू राहणार : धुमाळ

सध्या देशभरात सुरू असलेल्या वातावरणामुळे आयपीएल रद्द करण्यात येणार आहे किंवा काही सामने पुढे ढकलण्यात येतील, अशी चर्चा सगळीकडे सुरू आहे. मात्र बीसीसीआय आणि आयपीएलच्या प्रशासकीय समितीने या अफवांना धुडकावून लावले. आयपीएलचे कार्याध्यक्ष अरुण धुमाळ यांनी स्वत: तूर्तास शासनाकडून कोणतेही आदेश न आल्याने आयपीएल नियोजनाप्रमाणेच सुरू राहील, असे सांगितले. तसेच पंजाब-मुंबई यांच्यात धरमशाला येथे होणारी लढत अन्य ठिकाणी खेळवण्याबाबतचा निर्णय पुढील काही दिवसांत घेण्यात येईल, असेही ते म्हणाले. रविवार, ११ मार्चला पंजाब-मुंबई आमनेसामने येणार असून त्यासाठी बुधवारी मुंबईचा संघ धरमशाला येथे रवाना होणार होता. मात्र धरमशाला येथील विमानतळ सध्या बंद असून अनेक ठिकाणी सुरक्षाही वाढवण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in