
लंडन : क्रिकेटचा दौरा म्हणजे कौंटुबिक सहल नव्हे. येथे तुम्ही देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी येता. त्यामुळे कुटुंबाने सोबत राहण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संघासाठी कसे चांगले योगदान देऊ शकता, याकडे लक्ष देणे गरजेचे आहे, असे स्पष्ट मत भारताचा प्रशिक्षक गौतम गंभीरने व्यक्त केले.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतील अपयशानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही कठोर नियमावली जाहीर केली. त्यानुसार आता ४० दिवसांपेक्षा मोठा विदेश दौरा असेल, तर खेळाडूंची पत्नी व अन्य कुटुंबीय दोन आठवड्यांपेक्षा अधिक कालावधी त्यांच्यासोबत राहू शकत नाहीत. काही खेळाडूंनी यावर टीका केली होती. तसेच विराट कोहलीनेसुद्धा याविषयी स्पष्ट नाराजी व्यक्त करत कुटुंब खेळाडूसाठी किती मोलाचे आहे, हे सांगितले होते. विराटच्या निवृत्तीमागे हा नियमही कारणीभूत असल्याचे समजते. मात्र गंभीरने चेतेश्वर पुजाराला स्टार स्पोर्ट्ससाठी दिलेल्या मुलाखतीत बीसीसीआयच्या या नियमास पाठिंबा दिला.
“कुटुंब प्रत्येकासाठीच महत्त्वाचे असते. मात्र व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून तुम्हाला एक बाब लक्षात घेणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही क्रिकेट दौऱ्यावर जाताना आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करता. तुम्ही एखादे लक्ष्य साध्य करण्याच्या उद्दिष्टाने येथे आलेला असता. अशा वेळी तुमचे लक्ष फक्त त्या ध्येयावर असणे गरजेचे आहे. फार मेहनतीने तुम्हाला ड्रेसिंग रूममध्ये येण्याची संधी मिळते,” असे गंभीर म्हणाला.
“कुटुंब तुम्हाला सहाय्यासाठी नेहमीच असेल. मात्र त्यांच्या साथ नसल्याने तुमच्या कामगिरीवर परिणाम झाला, तर तुम्ही क्रिकेटपटू म्हणून कमी पडत आहात. माझ्यासाठी संघाचे हीत अधिक मोलाचे आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या ध्येयाशी एकनिष्ठ राहून संघाला ती मालिका किंवा ती ट्रॉफी कशी जिंकवून देता येईल, या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे,” असेही गंभीरने नमूद केले.