नवी दिल्ली : रोहित शर्माकडून हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद सोपवल्यानंतर समाज माध्यमांवर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच मुंबईच्या ट्विटर व इन्स्टाग्रामवरील पाठिराख्यांमध्येही लक्षणीय घट झाली आहे. अशा स्थितीत भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनीही या प्रकरणावर आपले मत नोंदवले आहे.
“आयपीएलमध्ये फलंदाज म्हणून रोहितची कामगिरी गेल्या काही हंगामांपासून खालावलेली आहे. कदाचित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सातत्याने भारताचे नेतृत्व केल्यामुळे तसेच शारीरिक व मानसिक दमछाक झाल्यानेही असे होऊ शकते. त्यामुळे मुंबई इंडियन्सने हार्दिकला भविष्याच्या दृष्टीने कर्णधार करण्याचा निर्णय चुकीचा आहे, असे म्हणता येणा नाही,” असे गावसकर म्हणाले. आपल्याला तो निर्णय चूक की बरोबर हे ठरवण्याचा अधिकार नसून आयपीएलच्या कामगिरीद्वारेच ते समजू शकले, असेही त्यांनी नमूद केले.
“गेल्या २-३ हंगामांत मुंबईला संघर्ष करावा लागला. त्यामुळेच कदाचित संघ व्यवस्थापनाला हार्दिकच्या रूपात युवा व नव्या विचारसरणीच्या कर्णधाराची गरज भासली असेल. हार्दिकने आयपीएलमध्ये गुजरातला दोन्ही हंगामात अंतिम फेरीपर्यंत मजल मारून देताना एकदा विजेतेपदही मिळवले,” असे गावसकर यांनू नमूद केले.