जर्मनीचे महान फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाऊर यांचे निधन

फुटबॉल विश्वात बेकेनबाऊर ‘डेर कॅसर’ या टोपण नावाने लोकप्रिय होते. बेकेनबाऊर यांचा मैदानावरील वावर जितका आक्रमक दिसायचा तेवढा तो मोहकही होता.
जर्मनीचे महान फुटबॉलपटू फ्रान्झ बेकेनबाऊर यांचे निधन

बर्लिन : फुटबॉल विश्वातील जर्मनीचे सर्वकालीन सर्वोत्तम फुटबॉलपटूंपैकी एक फ्रान्झ बेकेनबाऊर यांचे सोमवारी रात्री निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणाऱ्या तीन जणांमध्ये बेकेनबाऊर यांचाही समावेश होतो. ‘फिफा’च्या पुरस्कार समितीतही बेकेनबाऊर यांनी काही काळ काम केले.

बेकेनबाऊर हे जर्मन फुटबॉलचा चेहरा होते. पश्चिम जर्मनीसाठी बेकेनबाउर १०४ सामने खेळले. कारकीर्दीत १९७४ मध्ये विश्वचषक विजेत्या जर्मन संघाचे ते कर्णधार होते. त्यानंतर १६ वर्षांनी व्यवस्थापक म्हणून काम करताना १९९० मध्ये त्यांनी जर्मनीला दुसऱ्यांदा विश्वविजेते केले. तेव्हा जर्मनीने अर्जेंटिनाचा पराभव केला. बेकेनबाऊर यांनी कारकीर्दीत ७०च्या दशकात बायर्न म्युनिककडून खेळताना युरोपियन अजिंक्यपदाची हॅट‌्ट्रिक नोंदवली. सर्वोच्च प्रतिभेचा बचावपटू म्हणून त्यांची ख्याती होती.

फुटबॉल विश्वात बेकेनबाऊर ‘डेर कॅसर’ या टोपण नावाने लोकप्रिय होते. बेकेनबाऊर यांचा मैदानावरील वावर जितका आक्रमक दिसायचा तेवढा तो मोहकही होता. पायात चेंडू आला की तो खेळवत खोलवर चाल रचण्याची बेकेनबाऊर यांची हातोटी त्यांचे खेळातील श्रेष्ठत्व सिद्ध करणारी होती.

झळाळती कारकीर्द

पहिल्या विश्वविजेतेपदानंतर बेकेनबाऊर यांची कारकीर्द झळाळतीच राहिली. दोन वेळा बेकेनबाऊर ‘बॅलन डी’ओर पुरस्काराचे मानकरी ठरले होते.

१९८४ मध्ये अमेरिकन लीगमध्ये न्यूयॉर्क कॉसमॉसकडून ते अखेरचा सामना खेळले.

निवृत्तीनंतर लगेच त्याच वर्षी पश्चिम जर्मनीने बेकेनबाऊरची संघाच्या व्यवस्थापकपदी नियुक्ती केली.

व्यवस्थापक म्हणून काम करताना दोन वर्षांतच १९८६ मध्ये बेकेनबाऊर यांनी जर्मनीला अंतिम फेरीत नेले. मग चार वर्षांनी १९९०मध्ये जर्मनीला विश्वविजेते केले.

logo
marathi.freepressjournal.in