ऑलिम्पिक पात्रतेच्या मार्गात जर्मनीचा अडथळा; भारतीय महिला संघाची आज महत्त्वपूर्ण उपांत्य लढत

एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताची गुरुवारी बलाढ्य जर्मनीशी गाठ पडणार आहे. रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर ही लढत होईल.
ऑलिम्पिक पात्रतेच्या मार्गात जर्मनीचा अडथळा; भारतीय महिला संघाची आज महत्त्वपूर्ण उपांत्य लढत

रांची : गोलरक्षक सविता पुनियाच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय महिला संघ पॅरिस ऑलिम्पिकचे स्थान पक्के करण्यापासून फक्त एक पाऊल दूर आहे. एफआयएच ऑलिम्पिक पात्रता हॉकी स्पर्धेतील उपांत्य फेरीत भारताची गुरुवारी बलाढ्य जर्मनीशी गाठ पडणार आहे. रांची येथील जयपाल सिंह स्टेडियमवर ही लढत होईल.

जॅनेक शॉपमन यांच्या प्रशिक्षणाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने साखळी फेरीत ब-गटात दुसरे स्थान मिळवले. अमेरिकेविरुद्ध सलामीचा सामना गमावल्यावर भारताने न्यूझीलंडला ३-१, तर इटलीला ५-१ अशी धूळ चारली. त्यामुळे दोन विजयांच्या सहा गुणांसह भारताने आगेकूच केली. या स्पर्धेत अंतिम फेरीत पोहोचणारे दोन संघ तसेच तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकणारा असे एकूण तीन संघ ऑलिम्पिकसाठी थेट पात्र ठरणार आहेत. २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान पॅरिस ऑलिम्पिकचा थरार रंगणार आहे.

दुसरीकडे जर्मनीने अ-गटात दोन विजय व एका बरोबरीच्या ७ गुणांसह अग्रस्थान पटकावून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. त्यांनी तीन सामन्यांत तब्बल १४ गोल नोंदवले आहेत. त्यामुळे भारताला त्यांच्या आक्रमणपटूंना रोखण्याचे आव्हान असेल. जागतिक क्रमवारीत जर्मनी पाचव्या, तर भारत सहाव्या स्थानी आहे.

भारताकडून या स्पर्धेत उदिता दुहानने सर्वाधिक तीन गोल केले आहेत. तिला सलिमा टेटे, संगीता कुमारी, नवनीत कौर यांची उत्तम साथ लाभत आहे. भारताने उपांत्य लढत गमावल्यास त्यांना किमान तिसऱ्या क्रमांकाची लढत जिंकणे अनिवार्य असेल. भारताने तीन सामन्यांत मिळून तब्बल १२ वेळा पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची संधी गमावली. त्यामुळे गुरुवारी त्यांना या चुका टाळाव्या लागतील. दुसऱ्या उपांत्य फेरीत अमेरिका आणि जपान आमनेसामने येतील. २० जानेवारी रोजी अंतिम सामना खेळवण्यात येईल.

जर्मनीविरुद्ध २००६पासून झालेल्या सात सामन्यांपैकी भारताने दोन लढती जिंकल्या आहेत, तर ५ वेळा जर्मनीने बाजी मारली आहे.

पेनल्टी कॉर्नरवर गोल न करणे आम्हाला महागात पडू शकते. जर्मनीविरुद्ध आम्ही सर्वोत्तम कामगिरी करू, याची खात्री आहे. ऑलिम्पिक पात्रतेचे स्थान पक्के करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत.

- जॅनेक शॉपमन, भारताच्या प्रशिक्षिका

- वेळ : सायंकाळी ७.३० वाजल्यापासून g थेट प्रक्षेपण : स्पोर्ट्स १८ वाहिनी आणि जिओ सिनेमा ॲप

logo
marathi.freepressjournal.in