गिल वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू; बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा होणार विशेष गौरव

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून हैदराबाद येथेच प्रारंभ होणार आहे.
गिल वर्षातील सर्वोत्तम भारतीय क्रिकेटपटू; बीसीसीआयच्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात 
माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींचा होणार विशेष गौरव

हैदराबाद : तारांकित युवा सलामीवीर शुभमन गिलची २०२३ या वर्षातील सर्वोत्तम पुरुष भारतीय क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) मंगळवारी होणाऱ्या वार्षिक पुरस्कार सोहळ्यात माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचाही विशेष गौरव करण्यात येणार आहे. भारत-इंग्लंड संघांतील निवडक खेळाडू या सोहळ्यासाठी उपस्थित असतील, असे समजते.

भारत-इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेला गुरुवारपासून हैदराबाद येथेच प्रारंभ होणार आहे. गिलने २०२३ या वर्षात २९ एकदिवसीय सामन्यांत ५ शतकांसह १,५८४ धावा केल्या. त्याने न्यूझीलंडविरुद्ध एकदिवसीय प्रकारात द्विशतकही झळकावले. वर्षभरात टी-२०, एकदिवसीय, कसोटी व आयपीएल अशा सर्व प्रकारांत शतक साकारणारा तो एकमेव भारतीय ठरला. त्याने गतवर्षीच एकदिवसीय प्रकारात सर्वात जलद २,००० धावांचा टप्पा गाठणारा खेळाडू ठरण्याचा मान मिळवला.

दुसरीकडे ६१ वर्षीय शास्त्री यांच्या प्रशिक्षणाच्या कारकीर्दीत भारताने दोन वेळा (२०१८-१९, २०२०-२१) ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्यांच्याच भूमीत कसोटी मालिका जिंकली. ८० कसोटी व १५० एकदिवसीय सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शास्त्री यांनी २०१४ ते २०१६ आणि २०१८ ते २०२१ या काळात भारताचे प्रशिक्षकपद भूषवले. त्यांच्या कार्यकाळात भारताने २०१९च्या विश्वचषकाची उपांत्य फेरी, तर २०२१च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची अंतिम फेरीही गाठली. मात्र आयसीसी जेतेपदाने भारताला हुलकावणीच दिली. दरम्यान, २०१९ नंतर प्रथमच बीसीसीआयचा वार्षिक पुरस्कार सोहळा रंगणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in