महाराष्ट्राच्या यशात मुलींची चमक! स्टीपलचेसमध्ये अंजली-चैतालीची अनुक्रमे सुवर्ण-रौप्यकमाई; नेमबाजीत प्राचीला कांस्य, सांघिक बास्केटबॉलमध्येही कांस्यपदक

नेमबाजीमध्ये प्राचीने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला.
महाराष्ट्राच्या यशात मुलींची चमक! स्टीपलचेसमध्ये अंजली-चैतालीची अनुक्रमे सुवर्ण-रौप्यकमाई; नेमबाजीत प्राचीला कांस्य, सांघिक बास्केटबॉलमध्येही कांस्यपदक

चेन्नई : खेलो इंडिया स्पर्धेत गुरुवार आणि शुक्रवार मिळून झालेल्या विविध क्रीडा प्रकारांमध्ये महाराष्ट्राच्या मुलींनी चमकदार कामगिरी केली. महाराष्ट्राने दिवसभरात १ सुवर्ण, २ रौप्य व ४ कांस्यपदकांची कमाई करतानाच पदकतालिकेतील अग्र्स्थान कायम राखले आहे. स्टीपलचेस शर्यतीत अंजली मडवी व चैताली बोरेकर यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्यपदकाची कमाई केली. नेमबाजीत प्राची गायकवाडने कांस्यपदकाचा वेध साधला. तसेच बास्केटबॉलच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या मुलींनी कांस्यपदक पटकावले.

२ हजार मीटर स्टीपलचेस शर्यतीत नागपूरच्या अंजलीने ७ मिनिटे, १६.५१ सेकंद वेळ नोंदवून सुवर्णपदक जिंकले. दुसऱ्या क्रमांकावरील चैतालीने ७ मिनिटे, १६.९६ सेकंद अशी वेळ नोंदवली. मी आणि चैताली चांगल्या मैत्रिणी आहोत. आम्हा दोघींनीही पदक जिंकल्याने मला आनंद झाला आहे, असे अंजली म्हणाली. महाराष्ट्राच्या सिया सावंतला मात्र दुहेरी सुवर्णपदकाने हुलकावणी दिली. बुधवारी १०० मीटर शर्यतीत सुवर्ण जिंकणाऱ्या सियाला २०० मीटर शर्यतील रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तिने २५.१६ सेकंद अशी वेळ नोंदवली.

नेमबाजीमध्ये प्राचीने ५० मीटर रायफल थ्री-पोझिशन प्रकारात कांस्यपदकावर निशाणा साधला. तिने ४३९.६ गुण कमावले. मुंबईकर प्राचीने पात्रता फेरीत पाचवे स्थान मिळवले होते. महाराष्ट्राच्याच वेदांती भटला चौथ्या स्थानी समाधान मानावे लागले. बास्केटबॉलमध्ये मुलींच्या सांघिक प्रकारात महाराष्ट्राने मध्य प्रदेशला ९०-७१ असे नमवताना कांस्यपदकाला गवसणी घातली. सानिका फुले (२० गुण), अनया भावसार, मानसी निर्मळकर यांनी महाराष्ट्राच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.

याव्यतिरिक्त, महिलांच्या १,००० मीटर स्प्रिंट रिले शर्यतीत मधुरा बिरजे, ऋतुजा भोसले, अलिझा मुल्ला आणि श्रावणी सांगळे यांच्या चौकडीने महाराष्ट्राला कांस्यपदक मिळवून दिले. पदकतालिकेत अग्रस्थानी विराजमान असलेल्या महाराष्ट्राच्या खात्यात ७९ पदके जमा आहेत. यामध्ये २६ सुवर्ण, २३ रौप्य, ३० कांस्य पदकांचा समावेश आहे. तमिळनाडू ६० पदकांसह दुसऱ्या स्थानी आहे.

तिहेरी उडीत भूषणला कांस्य

महाराष्ट्राच्या भूषण शिंदेने तिहेरी उडीत कांस्यपदक जिंकले. त्याने सहाव्या प्रयत्नात १४.०८ मीटरपर्यंत उडी मारली. तमिळनाडूच्या रवी प्रकाश व के. युवराज यांनी अनुक्रमे सुवर्ण व रौप्य जिंकले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in