ग्लेन मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; १४ वर्षांच्या शानदार कारकीर्दीला पूर्णविराम

"मला मेलबर्न क्रिकेट मैदानावर निरोपाचा सामना खेळण्याची छोटीशी आशा होती. मात्र...
ग्लेन मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; १४ वर्षांच्या शानदार कारकीर्दीला पूर्णविराम
ग्लेन मॅक्सवेलचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा; १४ वर्षांच्या शानदार कारकीर्दीला पूर्णविरामछाया सौ : एक्स
Published on: 

सिडनी : ऑस्ट्रेलियाचा आक्रमक अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेल याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तब्बल १४ वर्षांच्या कारकीर्दीनंतर त्याने क्रिकेटच्या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून निरोप घेण्याचा निर्णय घेतला.

स्फोटक फलंदाजीसाठी ‘बिग शो’ या टोपणनावाने ओळखल्या जाणाऱ्या ३८ वर्षीय मॅक्सवेलने मंगळवारी एका पॉडकास्टच्या माध्यमातून निवृत्तीची घोषणा केली. यंदाच्या आयसीसी टी-२० विश्वचषकात ओमानविरुद्धचा सामना हा मॅक्सवेलचा ऑस्ट्रेलियासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. याशिवाय व्हिक्टोरियाकडून ५० षटकांचे आणि चार दिवसांचे देशांतर्गत क्रिकेट तसेच लाल चेंडूच्या क्रिकेटमधूनही निवृत्त होत असल्याचे त्याने स्पष्ट केले.

२०२३च्या विश्वचषकात अफगाणिस्तान संघाविरुद्ध झळकावलेले त्याचे द्विशतक क्रिकेट इतिहासातील अविस्मरणीय खेळींपैकी एक ठरले. प्रचंड थकवा आणि शारीरिक त्रासाचा सामना करत त्याने २०१ धावांची नाबाद खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने अशक्यप्राय वाटणारा विजय मिळवला होता.

‘द फायनल वर्ड’ या पॉडकास्टमध्ये मॅक्सवेल म्हणाला, “मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करत आहे. व्हिक्टोरियाकडून खेळल्या जाणाऱ्या ५० षटकांच्या आणि चार दिवसांच्या क्रिकेटलाही मी अलविदा करत आहे.” २०२८मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पुढील १२ ते २४ महिन्यांत मोठे बदल अपेक्षित आहेत. नव्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव मिळावा आणि त्यांना दबावाखाली खेळण्याची संधी मिळावी, यासाठी संघव्यवस्थापनाने प्रयत्न करणे आवश्यक असल्याचेही त्याने सांगितले.

मेलबर्नवर अखेरची लढत खेळायची होती!

निवृत्तीचा निर्णय घेताना शरीराच्या तंदुरुस्तीचाही विचार केल्याचे मॅक्सवेलने सांगितले. कारकीर्दीतील उर्वरित काही स्पर्धांसाठी शरीराची काळजी घेणे आवश्यक असल्याचे त्याने स्पष्ट केले. मेलबर्न क्रिकेट मैदानावर निरोपाचा सामना खेळण्याची छोटीशी आशा होती. मात्र संघाच्या निवडीमागील व्यवस्थापनाची भूमिका आपण समजू शकतो, असेही त्याने नमूद केले.

कारकीर्दीचा आढावा

  • वर्षे : १४ (२०१२ ते २०२६)

  • एकदिवसीय सामने : १४९

  • धावा : ३,९९०

  • टी-२० सामने : १३०

  • धावा : २,८९७

  • कसोटी सामने : ७

  • आंतरराष्ट्रीय शतके : १०

  • आंतरराष्ट्रीय बळी : १३६

  • २०१५, २०२३ एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.

  • २०२१मध्ये टी-२० विश्वचषक विजेत्या संघाचा सदस्य.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)