ऑस्ट्रेलियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने आयपीएल २०२६ च्या लिलावातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. ३७ वर्षीय खेळाडूने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबत अधिकृत माहिती दिली. या, निर्णयानंतर ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, मॅक्सवेलने निवृत्तीबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. आयपीएल २०२६ च्या लिलावापूर्वी पंजाब किंग्सने मॅक्सवेलला रिलीज केले होते. काही दिवसांपूर्वी, फाफ डू प्लेसी आणि आंद्रे रसल यांनी देखील आयपीएलमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.
मॅक्सवेलची आयपीएलमधून निवृत्ती ? सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट
ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलने इन्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत मिनी लिलावातून आपले नाव मागे घेत असल्याचे सांगितले. हा निर्णय “कठीण” असल्याचे तो म्हणाला. त्याने लिहिले की, “आयपीएलमधील अनेक अविस्मरणीय हंगामांनंतर, या वर्षी लिलावातून माझे नाव मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोठा निर्णय आहे आणि मी तो मोठ्या कृतज्ञतेने घेतो, कारण या लीगने मला खूप काही दिले आहे.”
“आयपीएलने मला केवळ चांगला खेळाडूच नाही, तर चांगला माणूसही बनवले. मला जगातील सर्वोत्तम खेळाडूंसोबत खेळण्याची, उत्कृष्ट संघांचा भाग होण्याची संधी मिळाली. भारतीय प्रेक्षकांची ऊर्जा मला नेहमीच प्रेरणा देत आली आहे. भारतातील आठवणी, आव्हाने आणि ऊर्जा माझ्या हृदयात कायम राहतील. धन्यवाद… लवकरच भेटू, अशी आशा आहे.
खराब फॉर्म, दुखापत आणि पंजाब किंग्जकडून रिलीज
ग्लेन मॅक्सवेल आयपीएल २०२५ मध्ये पंजाब किंग्जचा भाग होता. फ्रँचायझीने त्याला ४.२ कोटी रुपये मोजत संघात सामील केले होते. मॅक्सवेल गेल्या हंगामात पंजाब किंग्जसाठी अपेक्षेइतका यशस्वी ठरला नाही. हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यानंतर, त्याच्या बोटाला दुखापत झाली आणि त्याला आयपीएलमधून बाहेर जावे लागले. तो ६ डावामध्ये फक्त ४८ धावा करु शकला. खराब फॉर्म आणि दुखापतीच्या कारणामुळे पंजाबने त्याला रिलीज करण्याचा निर्णय घेतला.
मॅक्सवेलने अचानक आयपीएल २०२६ साठी नोंदणी न करण्याचा निर्णय का घेतला? यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, लिलावासाठी नोंदणी न करून, मॅक्सवेलने स्पष्ट केले की तो आयपीएल २०२६ मध्ये खेळणार नाही.
आयपीएल कारकीर्द
मॅक्सवेलने २०१२ मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले. २०१४ मध्ये, किंग्ज इलेव्हन पंजाबने मॅक्सवेलला आपल्या ताफ्यात दाखल करुन घेतले. जागतिक स्तरावर धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या मॅक्सवेलला आयपीएलमध्ये मात्र लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. यामुळे त्याला अनेकदा टिकेला सामोरे जावे लागले. मॅक्सवेलने आपीएलमधील १३ वर्षांतील १४१ सामन्यांमध्ये २,८१९ धावा केल्या असून त्याचा स्ट्राइक रेट १५५.१५ इतका होता.
आयपीएल २०२६ साठीचे मिनी लिलाव १६ डिसेंबर रोजी अबू धाबी येथे होणार आहे. यासाठी १३५५ खेळाडूंनी आपले नाव नोंदवले आहे.