
जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या रिदम सांगवानने बुधवारी महिलांच्या २५ मीटर पिस्टल स्पर्धेत विजेतेपद पटकावून राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणीत हरियाणाचा दबदबा कायम राखला.
रिदमने सुर्वणपदकाच्या फेरीत ३१ गुण मिळविले. तिने २७ गुण मिळविणाऱ्या महाराष्ट्राच्या अभिंद्या अशोक पाटीलला मागे टाकले. कर्णी सिंह शूटिंग रेंजमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय नेमबाजी निवड चाचणीत दिल्लीच्या किशोरी नाम्या कपूरने २२ गुण मिळवत तिसरे स्थान पटकाविले. रिदमने पात्रता फेरीत ९५ स्पर्धकांमध्ये प्रथम स्थान मिळविले होते. तिने पात्रता फेरीत ५८५ गुण मिळविले होते. अभिंद्या पात्रता फेरीत ५७७ गुण मिळवत पाचव्या स्थानावर राहिली होती. किशोरी ५७५ गुणांसह सहाव्या स्थानावर गेली होती. महिलांच्या २५ मीटर पिस्टल स्पर्धेत ज्युनिअर गटात हरियाणाच्या दिव्यांशीने पंजाबच्या सिमरनप्रीत कौर बरारला नमवून सुवर्णपदक जिंकले. दिव्यांशीने २४ गुण पटकाविले, तर सिमरनप्रीतने २३ गुण मिळविले. खुशी कपूर १६ गुण मिळवत तिसऱ्या स्थानावर राहिली.