विराट कोहलीच्या कारकीर्दीतील सुवर्ण दिवस; ७१वे शतक झळकावले

भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवला.
विराट कोहलीच्या कारकीर्दीतील सुवर्ण दिवस; ७१वे शतक झळकावले

८ सप्टेंबर, २०२२ हा दिवस विराट कोहलीच्या कारकीर्दीत नक्कीच सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. २३ नोव्हेंबर, २०१९ रोजी साकारलेल्या अखेरच्या आंतरराष्ट्रीय शतकाला तीन वर्षे पूर्ण होण्यासाठी अवघे दोन महिने शिल्लक असताना भारताचा अनुभवी फलंदाज कोहलीने सर्वोत्तम लयीत परतल्याचे संकेत देताना ७१वे शतक झळकावले. कोहलीने ६१ चेंडूंत साकारलेल्या नाबाद १२२ धावांच्या खेळीमुळे भारताने आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अफगाणिस्तानचा १०१ धावांनी धुव्वा उडवला. कोहलीचे हे ट्वेन्टी-२० प्रकारातील पहिलेच शतक ठरले, हे विशेष.

बांगलादेशविरुद्ध २०१९मध्ये झालेल्या त्या डे-नाइट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी कोहलीने १३६ धावा केल्या होत्या. त्यानंतर जवळपास अडीचहून अधिक वर्षांचा कालावधी उलटला तरी कोहलीचा शतक दुष्काळ संपत नव्हता. आशिया चषकातील भारत-अफगाणिस्तान या दोन्ही संघांचे आव्हान आधीच संपुष्टात आले आहे. त्यामुळे उभय संघांत गुरुवारी झालेल्या लढतीला तसे फारसे महत्त्वही नव्हते. परंतु रोहित शर्माच्या अनुपस्थितीत सलामीला संधी मिळालेल्या कोहलीने ३३ वर्षीय कोहलीने सर्वस्व पणाला लावले. त्याने तब्बल १२ चौकार आणि सहा षटकारांची आतषबाजी करताना ५३ चेंडूंत शतक झळकावले. ८४ डावांनंतर प्रथमच कोहलीने शतकाची वेस ओलांडली.

दरम्यान, विश्रांती घेणाऱ्या रोहितच्या जागी के. एल. राहुलने भारताचे नेतृत्व करताना रोहित, हार्दिक आणि यजुवेंद्र चहलच्या जागी दिनेश कार्तिक, दीपक चहर आणि अक्षर पटेल या तिघांना खेळवण्याचा निर्णय घेतला. राहुलनेसुद्धा सूर गवसल्याचे संकेत देताना ४१ चेंडूंत ६२ धावा फटकावल्या. राहुल आणि कोहली यांनी ७६ चेंडूंत ११९ धावांची सलामी दिली. कोहली अखेरपर्यंत नाबाद राहिला. तर ऋषभ पंतने १६ चेंडूंत नाबाद २० धावा फटकावल्याने भारताने २० षटकांत २ बाद २१२ धावांपर्यंत मजल मारली. प्रत्युत्तरात, अफगाणिस्तानला २० षटकांत ८ बाद १११ धावाच करता आल्या. भुवनेश्वर कुमारने अवघ्या चार धावांत पाच बळी पटकावण्याची किमया साधली.

आता रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात पाकिस्तानसमोर श्रीलंकेचे आव्हान असेल. भारताने सुपर-फोरमध्ये अनुक्रमे पाकिस्तान व श्रीलंकाकडून पराभव पत्करला.

logo
marathi.freepressjournal.in