Vinesh Phogat: भारत सरकारने विनेशला सर्वतोपरी मदत केली -मांडवीय

Paris Olympics 2024: विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरल्यानंतर देशाची पुरती नाचक्की झाली असतानाच, हा मुद्दा बुधवारी लोकसभेतही गाजला. याविषयी क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत निवेदन केले.
Vinesh Phogat: भारत सरकारने विनेशला सर्वतोपरी मदत केली -मांडवीय
PTI
Published on

नवी दिल्ली : विनेश फोगट ५० किलो वजनी गटात अपात्र ठरल्यानंतर देशाची पुरती नाचक्की झाली असतानाच, हा मुद्दा बुधवारी लोकसभेतही गाजला. याविषयी क्रीडामंत्री मनसुख मांडवीय यांनी लोकसभेत निवेदन केले.

“भारताची पैलवान विनेश फोगट पॅरिस ऑलिम्पिकमधून बाहेर झाल्याबद्दल माहिती देत आहे. विनेश ही ५० किलो वजनी गटात खेळत होती. निश्चित वजनापेक्षा १०० ग्रॅम वजन जास्त भरले. स्पर्धेसाठी तिचे वजन ५० किलो असणे आवश्यक होते. जागतिक कुस्ती महासंघाच्या नियमांनुसार सर्व स्पर्धकांसाठी, दररोज सकाळी वजन चाचणी केली जाते. नियम ११ नुसार एखाद्या खेळाडूने पहिल्या किंवा दुसऱ्या चाचणीत भाग न घेतल्यास किंवा अयशस्वी ठरल्यास त्याला स्पर्धेतून बाहेर काढले जाते किंवा कोणतेही कारण न देता शेवटच्या स्थानी ठेवले जाते,” असे क्रीडामंत्री मांडवीय यांनी लोकसभेत सांगितले. ते म्हणाले की, “७ ऑगस्ट २०२४ रोजी ५० किलो वजनी गटातील स्पर्धकांच्या वजनाची मोजणी करण्यासाठी पॅरिसमधील वेळेनुसार सव्वासात वाजता ही वजन चाचणी घेण्यात आली. विनेश फोगटचे वजन ५० किलो १०० ग्रॅम आढळून आल्यामुळे तिला स्पर्धेसाठी अपात्र ठरवण्यात आले. या प्रकरणात भारतीय ऑलिम्पिक महासंघाने आंतरराष्ट्रीय कुस्ती संघासमोर निषेध दर्शवला आहे. आयओएची अध्यक्षा पी. टी. उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्याशी चर्चा करून योग्य कार्यवाही करण्यासाठी सूचना केली होती,” अशी माहिती मांडवीय यांनी दिली.

logo
marathi.freepressjournal.in