पॅरिस : १५ दिवसांच्या थरारानंतर पॅरिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा शानदार समारोप सोहळा रविवारी मध्यरात्री पार पडला. पॅरिसच्या मेयर ॲने हिडाल्गो यांनी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांच्या उपस्थितीत ऑलिम्पिक ध्वज लॉस एंजेल्सच्या मेयर कॅरेन बास यांच्याकडे सुपूर्द केला आणि पॅरिस ऑलिम्पिक संपल्याची एकप्रकारे अधिकृत घोषणा केली. आता २०२८ मध्ये लॉस एंजेल्स येथे पुढील ऑलिम्पिक स्पर्धा रंगेल.
यंदा २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान रंगलेल्या या खेळाच्या महाकुंभात ३२ क्रीडा प्रकारांचा समावेश होता. त्यामध्ये २०६ देशांच्या १०,५००हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला. ऑलिम्पिकचा उद्घाटन सोहळा सीन नदीवर पार पडला होता. मात्र निरोप समारंभासाठी स्टॅड दी फ्रान्स या राष्ट्रीय स्टेडियमला पसंती देण्यात आली. यावेळी अमेरिकेचा तारांकित अभिनेता टॉम क्रूसही उपस्थित होता.
भव्यदिव्य रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि फ्रान्सच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम पार पडल्यावर सर्व देशांतील ध्वजवाहकांचे संचलन झाले. भारताकडून हॉकी संघाचा निवृत्त गोलरक्षक पी. आर. श्रीजेश आणि यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदके कमावणारी नेमबाज मनू भाकर यांनी ध्वजवाहकाची भूमिका बजावली. उद्घाटन सोहळ्यात टेबल टेनिसपटू अचंता शरथ कमल व बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू भारताचे ध्वजवाहक होते.
“पॅरिस ऑलिम्पिकने क्रीडा क्षेत्राची ताकद संपूर्ण विश्वाला दाखवून दिली. खेळाडूंमध्ये कितपत क्षमता आहे, हे याद्वारे स्पष्ट झाले. अग्रस्थानासाठी दोन देशांमधील चुरस अखेरच्या दिवसापर्यंत पाहण्यासारखी होती. क्रीडा क्षेत्रात संपूर्ण जगाला एकत्रित आणण्याची ताकद आहे, हे पॅरिस ऑलिम्पिकद्वारे पुन्हा सिद्ध झाले,” असे थॉमस बाख म्हणाले.