वर्ल्ड चॅम्पियन 'टीम इंडिया'चं  मुंबईत होणार ग्रॅण्ड वेलकम, ओपन बस राईडनंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रम
bcci

वर्ल्ड चॅम्पियन 'टीम इंडिया'चं मुंबईत होणार ग्रॅण्ड वेलकम, ओपन बस राईडनंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रम

क्रिकेटप्रमींना पाहता येणार १६ वर्ष जुनं दृश्य, विश्वविजेत्या टीम इंडियाचं उद्या मुंबईत आगमन होणार आहे.
Published on

मुंबई: अनेक वर्षाच्या प्रतिक्षेनंतर टीम इंडियानं भारतीय क्रिकेट चाहत्यांना आनंद दिला. २०२४ टी २० विश्वचषक जिंकून टीम इंडियाने ११ वर्षांनंतर ICC ट्रॉफी जिंकली. बार्बाडोस येथे खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून रोहित अॅण्ड कंपनी T20 विश्वविजेती बनली. आता मायदेशी परतल्यानंतर टीम इंडिया वर्ल्ड कप ट्रॉफीसह खुल्या बसमधून मुंबईचा दौरा करणार असल्याचं समजतंय. टीम इंडिया विशेष विमानानं बार्बाडोस येथून निघाली असून ती ४ जून रोजी दिल्लीत पोहोचेल. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून टीम इंडिया मुंबईला येणार आहे. मुंबईमध्ये विश्वविजेती रोहित अॅण्ड कंपनी ओपन बस राईड करणार असून त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. यापूर्वी महेंद्रसिंग धोनी आणि कंपनीने २००७ मध्ये टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्यांचं मुंबईत मोठं स्वागत करण्यात आलं होतं.

१६ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर जिंकला T20 विश्वचषक-

१६ वर्षांपूर्वी, जेव्हा टीम इंडियाने एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला T20 विश्वचषक जिंकला तेव्हा धोनीच्या संघाने मुंबईत ट्रॉफीसह बस परेड आयोजित केली होती. २००७ T20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळला गेला, जिथे भारताने अंतिम फेरीत पाकिस्तानला पराभूत करून ट्रॉफी जिंकली.

रिपोर्टनुसार उद्या टीम इंडिया बार्बाडोसहून परतल्यानंतर दिल्लीहून मुंबईत येणार आहे. त्यानंतर इथं त्यांचं भव्य स्वागत करण्यात येणार आहे. खुल्या बसमधून विश्वविजेता संघ वर्ल्डकप ट्रॉफीसह प्रवास करेल. त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

टीम इंडिया बार्बाडोसमध्ये अडकली होती-

यंदाचा T20 विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शनिवारी २९ जून रोजी बार्बाडोसमध्ये खेळला गेला. विजेतेपदाचा सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया चक्रीवादळामुळे बार्बाडोसमध्ये अडकली होती. मात्र, आता टीम इंडिया बीसीसीआयच्या विशेष विमानाने बार्बाडोसहून दिल्लीसाठी रवाना झाली असून गुरुवारी सकाळपर्यंत दिल्लीला पोहोचेल, असे मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहे.

भारताने T20 विश्वचषकाचे दुसरे जेतेपद पटकावले-

२००७ मध्ये पहिली T20 विश्वचषक स्पर्धा खेळली गेली होती, यामध्ये टीम इंडियाने बाजी मारली होती. यानंतर 'मेन इन ब्लू'नं या फॉरमॅटचे दुसरे जेतेपद पटकावण्यास १७ वर्षे लागली. यादरम्यान भारताने एकदिवसीय विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफीवरदेखील नाव कोरलं.

logo
marathi.freepressjournal.in