
अहमदाबाद : गत विजेता गुजरात टायटन्सचा संघ आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील आपली विजयी मालिका कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. गुरुवारी हा संघ संघर्ष करत असलेल्या लखनऊ सुपर जायंट्सशी भिडेल. या सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत अव्वल दोन संघांत राहण्यासाठी गुजरात प्रयत्नशील आहे.
आतापर्यंत झालेल्या १२ सामन्यांत १८ गुण मिळवून टायटन्सचा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यांनी ‘प्ले ऑफ’चे तिकीट मिळवले आहे. दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्ज हे संघ प्रत्येकी १७ गुणांसह दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी आहे. त्यामुळे अव्वल दोन संघांत प्रवेश मिळवण्यासाठी जोरदार स्पर्धा आहे.
गुजरातसाठी सर्वकाही योग्य होत आहे. त्यांची आघाडीची तिकडी चांगलीच फॉर्मात आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडाचे पुनरागमन झाल्याने गोलंदाजीला बळ मिळाले आहे. ड्रग्ज सेवन प्रकरणामुळे तो हंगामातील बरेच सामने बाहेर आहे.
दुसरीकडे सनरायजर्स हैदराबादविरुद्ध सोमवारी झालेल्या पराभवामुळे लखनऊच्या ‘प्ले ऑफ’ प्रवेशाच्या आशा संपुष्टात आल्या आहेत. पंतच्या नेतृत्वाखाली खेळणारा हा संघ सलग ४ सामन्यांत पराभूत झाला आहे. प्रमुख खेळाडूंचे अपयश आणि दुखापत याचा फटका संघाला बसला आहे. लखनऊला आतापर्यंत केवळ ५ सामन्यांत बाजी मारता आली आहे.
गुजरात आणि लखनऊ यांच्यात आतापर्यंत ६ सामने झाले आहेत. त्यातील ४ सामन्यांत गुजरातने बाजी मारली आहे, तर लखनऊने २ सामन्यांत विजय मिळवला आहे. यंदाच्या हंगामात दोन्ही संघांत एकमेव सामना झालेला आहे. लखनऊने हा सामना खिशात घातला आहे.
सुदर्शन, गिल आणि बटलरवर भिस्त
बी साई सुदर्शन (६१७ धावा), कर्णधार शुभमन गिल (६०१ धावा) आणि जोस बटलर (५०० धावा) यांच्या बटमधून धावा येत आहेत. गुजरातच्या विजयाचा पाया ते उभारत आहेत. या तिकडीने मिळून १६ अर्धशतके आणि शतके झळकावली आहेत. त्यांच्या खेळीत सातत्य राहिले आहे. या तिकडीवरच गुजरातची भिस्त आहे. टॉप ऑर्डरच्या चांगल्या कामगिरीमुळे मधल्या फळीची फारशी कसोटी लागलेली नाही.
प्रसिद्ध कृष्णा फॉर्मात
गुजरातच्या शानदार कामगिरीत फलंदाजीसह गोलंदाजी विभागही प्रभावी ठरला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा हा गुजरातच्या ताफ्यात असून तो यंदाच्या हंगामात आतापर्यंत चांगलाच लयीत आहे. त्याच्या खात्यात २१ विकेट असून बळी मिळवण्यात तो अव्वल स्थानी आहे. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि डावखुरा फिरकीपटू आर साई किशोर यांनीही शानदार गोलंदाजी कत प्रतिस्पर्धी संघाला धडकी भरवली आहे. या दुकलीने प्रत्येकी १५ विकेट्स आपल्या नावे केल्या आहेत. प्रतिस्पर्धी संघाला नियंत्रणात ठेवण्यात ही तिकडी उपयुक्त ठरत आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करण्यात या तिघांचा हातखंडा आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज त्यांच्या सापळ्यात अडकत आहेत. गुजरातने १२ सामन्यांत ९ विजय मिळवले असून केवळ २ सामन्यात पराभव स्विकारला आहे.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), रशिद खान, साई सुदर्शन, राहुल तेवतिया, शाहरूख खान, अनुज रावत, जेराल्ड कोएट्झे, गुर्नुर सिंग ब्रार, इशांत शर्मा, जयंत यादव, जोस बटलर, कगिसो रबाडा, करिम जनत, कुलवंत खेजरोलिया, कुमार कुशाग्र, महिपाल लोमरोर, मानव सुतार, मोहम्मद खान, मोहम्मद सिराज, निशांत सिंधू, प्रसिध कृष्णा, आर. साईकिशोर, शर्फेन रुदरफोर्ड, वॉशिंग्टन सुंदर, दसुन शनका.
लखनऊ सुपर जायंट्स : ऋषभ पंत (कर्णधार), रवी बिश्नोई, आयुष बदोनी, मयांक यादव, निकोलस पूरन, अब्दुल समद, एडीन मार्करम, आकाश दीप, अर्शीन कुलकर्णी, आर्यन जुयाल, आवेश खान, डेव्हिड मिलर, दिग्वेश सिंग, हिम्मत सिंग, एम. सिद्धार्थ, मॅथ्यू ब्रीट्झके, मिचेल मार्श, प्रिन्स यादव, राजवर्धन हंगर्गेकर, शाहबाझ अहमद, शामर जोसेफ, युवराज चौधरी, आकाश सिंग, शार्दूल ठाकूर.