

नवी दिल्ली : इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) १९वा हंगाम धडाक्यात सुरू झाला आहे. आता शनिवार, ४ एप्रिल रोजी चाहत्यांना यंदाच्या पर्वातील मनोरंजनाचा पहिला डबल डोस मिळणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर (पूर्वीचे फिरोजशाह कोटला) शनिवारी दुपारी मुंबई इंडियन्ससमोर दिल्ली कॅपिटल्सला रोखण्याचे आव्हान असेल. दुसरीकडे शनिवारी रात्री अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सची राजस्थान रॉयल्सशी गाठ पडेल. या लढतीत प्रामुख्याने आघाडीच्या फलंदाजांवर लक्ष असेल.
मार्च महिन्याच्या सुरुवातीला अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर टी-२० विश्वचषकाच्या महामुकाबल्यात भारताने न्यूझीलंडचा ९६ धावांनी फडशा पाडला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने एकंदर तिसऱ्यांदा, तर सलग दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विश्वविजयात अनेक हिऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले. भारत हा सलग दोन टी-२० विश्वचषक जिंकणारा तसेच मायदेशात जेतेपद मिळवणारा पहिलाच संघ ठरला. आता २० दिवसांच्या विश्रांतीनंतर भारताचे सर्व तारे पुन्हा आयपीएलच्या निमित्ताने मैदानात दिसत आहेत.
२८ मार्चपासून आयपीएलच्या १९व्या पर्वाला प्रारंभ झाला. काही लढतींमध्ये धावांचा वर्षाव पाहायला मिळाला, तर काही सामन्यांत गोलंदाजांनी फलंदाजांना रोखले. तसेच बहुतांश लढतींमध्ये नाणेफेक जिंकून धावांचा पाठलाग करणारा संघ जिंकला. यंदादेखील प्रत्येक संघाला १४ सामने खेळायचे आहेत. त्यांपैकी ७ लढती या घरच्या मैदानात, तर उर्वरित ७ लढती प्रतिस्पर्धी संघाच्या मैदानात होतील.
शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातला पहिल्या लढतीत पराभव पत्करावा लागला. या सामन्यात गुजरातची आघाडीची फळी अपयशी ठरली. तसेच गोलंदाजांमध्ये प्रसिध कृष्णाने काहीशी चमक दाखवली. आता गिल, साई सुदर्शन व जोस बटलर यांच्याकडून फलंदाजीत योगदान अपेक्षित आहे. गोलंदाजीत कगिसो रबाडा व मोहम्मद सिराज या जोडीकडून चांगली कामगिरी अपेक्षित आहे.
दुसरीकडे रियान परागच्या नेतृत्वात राजस्थानने पहिल्या लढतीत चेन्नईला धूळ चारली. वैभव सूर्यवंशीने शानदान अर्धशतक साकारले. तसेच यशस्वी जैस्वाल, ध्रुव जुरेल यांनी फलंदाजीत, तर नांद्रे बर्गर, जोफ्रा आर्चर यांनी गोलंदाजीत चमक दाखवली. रवींद्र जडेजानेही राजस्थानकडून पहिल्याच लढतीत खेळताना छाप पाडली. आता अहमदाबादवर धावांचा वर्षाव अपेक्षित असताना दोन्ही संघांतील फलंदाज कशी कामगिरी करणार, हे पाहणे रंजक ठरेल. गुजरातचा संघ पहिल्या, तर राजस्थानचा संघ दुसऱ्या विजयाच्या निर्धाराने मैदानात उतरेल.
उभय संघांत आतापर्यंत ८ सामने झाले असून गुजरातने त्यापैकी ६, तर राजस्थानने फक्त २ लढती जिंकल्या आहेत. आकडेवारी गुजरातच्या बाजूने असली, तरी राजस्थानचा संघ यंदा लयीत आहे. त्यामुळे शनिवारी सायंकाळी होणाऱ्या या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे लक्ष असेल.
प्रतिस्पर्धी संघ
गुजरात टायटन्स : शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, कुमार कुशाग्र, अनुज रावत, टॉम बँटन, ग्लेन फिलिप्स, साई सुदर्शन, निशांत सिंधू, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद खान, साई किशोर, जयंत यादव, जेसन होल्डर, राहुल तेवतिया, शाहरूख खान, कगिसो रबाडा, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मानव सुतार, गुर्नूर सिंग ब्रार, इशांत शर्मा, अशोक शर्मा, ल्यूक वूड, रशिद खान, कुलवंत खेजरोलिया.
राजस्थान रॉयल्स : रियान पराग (कर्णधार), शुभम दुबे, यशस्वी जैस्वाल, लुहान प्रिटोरियस, वैभव सूर्यवंशी, अमन राव, शिम्रॉन हेटमायर, ध्रुव जुरेल, रवी सिंग, दोनोवन फरेरा, दसुन शनका, रवींद्र जडेजा, जोफ्रा आर्चर, नांद्रे बर्गर, ब्रिजेश शर्मा, तुषार देशपांडे, क्वेना मफाका, ॲडम मिल्ने, सुशांत मिश्रा, विघ्नेश पुथूर, रवी बिश्नोई, संदीप शर्मा, कुलदीप सेन, यश पुनिया, युधवीर सिंग.
वेळ : सायंकाळी ७.३० वाजता
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी आणि जिओहॉटस्टार ॲप