गुजरात, बंगळुरू, पंजाब संघ बाद फेरीत; मुंबई, दिल्ली, लखनऊत एका जागेसाठी शर्यत

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम आता निर्णायक वळणावर आहे. रविवारी रात्री गुजरात टायटन्सने १० गडी राखून धडाकेबाज विजय नोंदवत बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम पक्के करण्याचा मान मिळवला. गुजरातच्या विजयाचा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनाही लाभ झाला. त्यांचेही बाद फेरीतील (प्ले-ऑफ) प्रवेश निश्चित झाला आहे.
गुजरात, बंगळुरू, पंजाब संघ बाद फेरीत; मुंबई, दिल्ली, लखनऊत एका जागेसाठी शर्यत
Published on

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा १८वा हंगाम आता निर्णायक वळणावर आहे. रविवारी रात्री गुजरात टायटन्सने १० गडी राखून धडाकेबाज विजय नोंदवत बाद फेरीतील स्थान सर्वप्रथम पक्के करण्याचा मान मिळवला. गुजरातच्या विजयाचा पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांनाही लाभ झाला. त्यांचेही बाद फेरीतील (प्ले-ऑफ) प्रवेश निश्चित झाला आहे. त्यामुळे आता फक्त उरलेल्या एका जागेसाठी मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनऊ सुपर जायंट्स या तीन संघांत पुढील काही दिवस चुरस पाहायला मिळणार आहे.

२२ मार्चपासून बंगळुरू-कोलकाता यांच्यातील लढतीद्वारे सुरू झालेला आयपीएलचा यंदाचा हंगाम ७ मेपर्यंत उत्तमरीत्या सुरू होता. त्यानंतर ८ मे रोजी दिल्ली-पंजाब यांच्यातील ५८वा सामना मध्यातच थांबवण्यात आला. भारत-पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली होती. त्यावेळी फक्त १७ सामने शिल्लक होते. अखेरीस स्थिती सुधारल्यावर शनिवार, १७ मेपासून आयपीएलला पुन्हा प्रारंभ झाला. बंगळुरू-कोलकाता यांच्यातील शनिवारचा सामना पावसामुळे रद्द झाल्याने चाहत्यांचा हिरमोड झाला.

रविवारी मात्र दुहेरी मनोरजांनाचा चाहत्यांनी आनंद लुटला. दुपारी पंजाबने राजस्थानवर १० धावांनी सरशी साधली. त्यावेळी त्यांनी अव्वल चार संघांतील स्थान आणखी भक्कम केले. मात्र रविवारी रात्री झालेल्या ६०व्या सामन्याद्वारे यंदाच्या आयपीएलमधील तीन बाद फेरीतील संघ सुनिश्चित झाले. गुजरातसह पंजाब व बंगळुरू संघाने आता आगेकूच केलेली आहे. युवा शुभमन गिलच्या नेतृत्वात खेळणाऱ्या गुजरातच्या शिलेदारांनी दिल्लीचा १० गडी राखून फडशा पाडला. दिल्लीचे २०० धावांचे लक्ष्य गुजरातने १९ षटकांत एकही बळी न गमावता गाठले. डावखुऱ्या साई सुदर्शनने नाबाद १०८ धावांची शतकी खेळी साकारली, तर गिलने नाबाद ९३ धावा फटकावल्या.

मुख्य म्हणजे आयपीएलच्या इतिहासात प्रथमच एखाद्या संघाने २०० धावांचे लक्ष्य फलंदाज न गमावता गाठले. याचेच फलित म्हणून गुजरातने गुणतालिकेत अग्रस्थानी झेप घेतानाच स्पर्धेतील नववा विजय नोंदवला. १२ सामन्यांत ९ विजय मिळवणारा गुजरातचा संघ आता अखेरच्या दोन्ही लढती घरच्या मैदानात खेळणार आहे. त्यामुळे त्यांना अव्वल दोन संघांत स्थान टिकवण्याचीही उत्तम संधी आहे. आयपीएलमध्ये गुणतालिकेत अव्वल दोन क्रमांकावर असलेल्या संघांना अंतिम फेरी गाठण्याच्या दोन संधी मिळतात. त्यामुळे गुजरातचा संघ २०२२ नंतर पुन्हा ही स्पर्धा जिंकण्यास आतुर असेल.

दुसऱ्या स्थानावर असलेल्या बंगळुरूचे व तिसऱ्या क्रमांकावरील पंजाबचेही १२ सामन्यांत प्रत्येकी १७ गुण आहेत. दोघांनीही प्रत्येकी आठ सामने जिंकले आहेत. मात्र धावगतीच्या तुलनेत बंगळुरू पंजाबपेक्षा किंचित सरस आहे. आता बंगळुरूचे अखेरचे दोन सामने अनुक्रमे हैदराबाद आणि लखनऊ यांच्याशी होणार आहेत. त्यांपैकी हैदराबादविरुद्धची लढत ते घरच्या मैदानात म्हणजेच चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळतील, तर लखनऊविरुद्ध त्यांचा सामना इकाना स्टेडियमवर होईल. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून स्पर्धेचा भाग असूनही बंगळुरूला अद्याप पहिले जेतेपद खुणावत आहे. त्यामुळे रजत पाटीदारच्या नेतृत्वात त्यांना ही संधी आहे.

दुसरीकडे पंजाबचा संघ शेवटचे दोन सामने अनुक्रमे दिल्ली आणि मुंबईशी खेळणार आहे. त्यांचे दोन्ही सामने हे जयपूरमध्ये होणार असून नुकताच पंजाबने तेथे राजस्थानला हरवले. त्यामुळे पंजाबसाठी ही जमेची बाजू ठरू शकते. २०१४ नंतर प्रथमच पंजाबने आयपीएलची बाद फेरी गाठली आहे. मुंबईकर श्रेयस अय्यर हा तीन संघांचे नेतृत्व करून बाद फेरी गाठणारा आयपीएलमधील पहिलाच कर्णधारसुद्धा ठरला आहे. गतवर्षी श्रेयसच्या नेतृत्वात कोलकाताने जेतेपद मिळवले. यंदा श्रेयस पंजाबला त्यांचे पहिलेवहिले जेतेपद मिळवून देणार का, हे पाहणे रंजक ठरेल.

आता वळूया अन्य तीन संघांकडे म्हणजेच मुंबई, दिल्ली व लखनऊ. पाच वेळच्या विजेत्या मुंबईने गेल्या हंगामातील अपयश बाजूला सारून यंदा लौकिकाला साजेसा खेळ केला आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात १२ सामन्यांतील ७ विजयांच्या १४ गुणांसह तूर्तास मुंबईचा संघ चौथ्या स्थानी आहे. बुधवारी वानखेडे स्टेडियमवर मुंबईची दिल्लीशी गाठ पडणार असून या लढतीत विजय मिळवल्यास मुंबईचे बाद फेरीतील स्थान ९० टक्के पक्के होईल. कारण अशा स्थितीत ते १६ गुणांवर पोहोचतील व त्यांची धावगतीही स्पर्धेतील सर्व संघांच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. मात्र २६ तारखेला पंजाबलाही नमवले, तर मुंबई अव्वल दोन स्थानांसाठीही दावेदारी करू शकते.

अक्षर पटलेच्या नेतृत्वात खेळणारा दिल्लीचा संघ सध्या परा‌भवाच्या चक्रव्यूहात अडकला आहे. पहिल्या पाचपैकी चार लढती जिंकणाऱ्या दिल्लीची गाडी नंतर रुळावरून घसरली. त्यामुळे १२ सामन्यांतील ६ विजय व एक रद्द लढतीच्या एकूण १३ गुणांसह हा संघ तूर्तास पाचव्या स्थानी आहे. दिल्लीला अनुक्रमे मुंबई, पंजाब यांना नमवल्याशिवाय पर्याय नाही. मात्र ते दोन्ही लढती प्रतिस्पर्ध्याच्या मैदानात खेळणार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर नक्कीच दडपण असेल.

ऋषभ पंतच्या नेतृत्वात खेळणाऱ्या लखनऊची अवस्थाही जवळपास दिल्लीसारखीच आहे. त्यांनाही उर्वरित तिन्ही लढतींमध्ये विजय मिळवण्यासह मुंबई, दिल्ली यांनी आपले सर्व सामने गमवावेत, अशी प्रार्थना करावी लागणार आहे. पहिल्या सहापैकी चार सामने जिंकणाऱ्या लखनऊला त्यानंतरच्या पाच लढतींमध्ये एकच विजय मिळवता आलेला आहे. त्यामुळे लखनऊ आता कामगिरी उंचावणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष असेल.

कोलकाता नाइट रायडर्स, सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स व चेन्नई सुपर किंग्ज या चार संघांचे आव्हान संपुष्टात आलेले आहे. त्यामुळे आता फक्त मुंबई, दिल्ली, लखनऊ यांच्यापैकी कोण बाद फेरीतील चौथा संघ ठरणार, याचीच उत्सुकता आहे.

हे सामने चुकवू नका!

  • मुंबई वि. दिल्ली : बुधवार, २१ मे

  • दिल्ली वि. पंजाब : शनिवार, २४ मे

  • मुंबई वि. पंजाब : सोमवार, २६ मे

  • बंगळुरू वि. लखनऊ : मंगळवार, २७ मे

logo
marathi.freepressjournal.in