अल्टिमेट खो-खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची मुंबई खिलाडीज् संघावर मात

बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रंजन शेट्टीने कर्णधाराला साजेसा खेळ करत आक्रमणात सहा गुणांची नोंद केली.
अल्टिमेट खो-खो स्पर्धेत गुजरात जायंट्स संघाची मुंबई खिलाडीज् संघावर मात

अल्टिमेट खो-खो लीगच्या चौथ्या दिवशी गुजरात जायंट्स संघाने मुंबई खिलाडीज् संघावर सलग दुसऱ्यांदा मात करताना हॅटट्रिकची नोंद केली. रंगतदार झालेल्या लढतीत रंजन शेट्टीच्या नेतृत्वाखाली गुजरात जायंट्स संघाने मुंबई खिलाडीज् संघावर १८ गुणांच्या फरकाने विजय मिळवला.

बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत रंजन शेट्टीने कर्णधाराला साजेसा खेळ करत आक्रमणात सहा गुणांची नोंद केली. विनायक पोकर्डे आणि निलेश पाटील यांनी अनुक्रमे ८ आणि ७ गुणांची कमाई करताना त्याला उत्कृष्ट साथ दिली. मुंबई खिलाडीज् संघाकडून दुर्वेश साळुंखे याने आक्रमणात ११ गुणांची नोंद करताना केलेली झुंज एकाकी ठरली. रंजन शेट्टीला सामन्यातील बेस्ट अटॅकर तर बेस्ट डिफेंडर पुरस्कार सुयश गरगटे (गुजरात जायंट्स) आणि अल्टिमेट खो-खो पुरस्कार दुर्वेश साळुंखे (मुंबई खिलाडीज्) याने पटकावला. गुजरात जायंट्स संघाने पावरप्ले मधून सुरुवात करताना अक्षय भांगारे, अभिनंदन पाटील यांचे वझिरात रूपांतर केले. हा निर्णय कमालीचा फायदेशीर ठरला आणि त्यांनी कर्णधार विजय हजारे, रोहन कोरे आणि विसाग एस ही मुंबईची पहिली तुकडी २ मिनिटे ७ सेकंदात तंबूत परतवून एकूण १० बचावपटू टिपताना आपल्या संघाला २५-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या बाजूला मुंबई खिलाडीज संघाने सुद्धा पावरप्लेमधून बचावाला प्रारंभ करताना गुजरातची पहिली तुकडी १ मिनिट ३० सेकंदात तंबूत परतवली. पहिल्या डावाअखेर दोन संघांमध्ये २७-२७ अशी बरोबरी झाली होती. गरगटेने दोन बोनस गुणांसह २ मिनिटे ३० सेकंद संरक्षण करताना गुजरातकडून कडवी झुंज दिली. गुजरात जायंट्स संघाने दुसऱ्या डावात वेगवान आक्रमण करताना एकूण ३७ गुणांची कमाई केली. त्यानंतर मुंबई सर्वोत्तम कामगिरी करूनही त्यांना अखेरच्या सात मिनिटांत केवळ २१ गुण मिळवता आले. त्यामुळे गुजरात जायंट्स संघाला मुंबई खिलाडीज संघावर सलग दुसऱ्या विजयाची नोंद करता आली.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in