मोहितपुढे हैदराबाद नतमस्तक; गुजरातचा हंगामातील दुसरा विजय

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. ट्रेव्हिस हेड (१९), मयांक अगरवाल (१६) या सलामीवीरांनी यावेळी निराशा केली. मात्र अभिषेक शर्मा (२९), हेनरिच क्लासेन (२४) यांनी फटकेबाजी केली. मोहितने अभिषेकचा अडसर दूर केला, तर रशिद खानने क्लासेनला बाद केले.
मोहितपुढे हैदराबाद नतमस्तक; गुजरातचा हंगामातील दुसरा विजय

अहमदाबाद : मध्यमगती गोलंदाज मोहित शर्माने (२५ धावांत ३ बळी) केलेल्या प्रभावी माऱ्याला डेव्हिड मिलर (२७ चेंडूंत नाबाद ४४ धावा) आणि साई सुदर्शन (३६ चेंडूंत ४५) यांच्या फलंदाजीची उत्तम साथ लाभली. त्यामुळे गुजरात टायटन्सने आयपीएलमध्ये रविवारी दुपारी झालेल्या लढतीत सनरायजर्स हैदराबादला ७ गडी आणि ५ चेंडू राखून धूळ चारली. गुजरातचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय ठरला, तर हैदराबादला तितक्याच लढतींमध्ये दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २० षटकांत ८ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली. ट्रेव्हिस हेड (१९), मयांक अगरवाल (१६) या सलामीवीरांनी यावेळी निराशा केली. मात्र अभिषेक शर्मा (२९), हेनरिच क्लासेन (२४) यांनी फटकेबाजी केली. मोहितने अभिषेकचा अडसर दूर केला, तर रशिद खानने क्लासेनला बाद केले. त्यामुळे हैदराबादची धावगती मंदावली. अब्दुल समदने (२९) अखेरच्या षटकात फटकेबाजी करून संघाला दीडशे धावांपलीकडे नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना वृद्धिमान साहा (२५) आणि कर्णधार शुभमन गिल (३६) यांनी चांगली सुरुवात केली. मात्र १० षटकांपूर्वी हे दोघेही बाद झाले. त्यानंतर सुदर्शन व मिलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६४ धावांची भागीदारी रचून संघाला विजयासमीप नेले. सुदर्शन ४ चौकार व १ षटकारासह ४५ धावांवर बाद झाला. मात्र मिलरने ४ चौकार व २ षटकारांसह २७ चेंडूंतच नाबाद ४४ धावा फटकावल्या. त्याने विजय शंकरसह (नाबाद १४) चौथ्या विकेटसाठी ३० धावांची भर घातली. अखेरच्या षटकातील पहिल्या चेंडूवर मिलरने विजयी षटकार लगावला. मोहितला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in