
अहमदाबाद : जोस बटलरच्या नाबाद ९७ धावा आणि शर्फेन रुदरफोर्डच्या ४३ धावा या जोडगोळीने ११९ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत शनिवारी दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत गुजरात टायटन्सला ७ विकेट राखून शानदार विजय मिळवून दिला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे.
दिल्लीने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना बटलरने केवळ ५४ चेंडूंत नाबाद ९७ धावांची खेळी खेळली. या खेळीत त्याने ११ चौकार आणि ४ षटकार लगावले. गुजरातने हे लक्ष्य १९.२ षटकांत पूर्ण केले. बटलरने या सामन्यात शतक झळकावले असते तर आयपीएलमधील त्याचे हे आठवे शतक ठरले असते.
गुजरातने नाणेफेकीचा कौल जिंकत फलंदाजांना अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर दिल्लीला प्रथम फलंदाजीला आमंत्रित केले. अक्षर पटेलने दिल्लीतर्फे ३२ चेंडूंत सर्वाधिक ३९ धावा केल्या. तर ट्रिस्टन स्टब्स (३१ धावा) आणि आशुतोष शर्मा (३७ धावा) यांनीही हातभार लावला.
फलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर प्रसिध कृष्णाने (४/४१) दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या सापळ्यात अडकवत त्यांची धावसंख्या २०३/८ अशी नियंत्रणात ठेवली. त्यानंतर बटलरने ५४ चेंडूंत ९७ धावांची वादळी खेळी खेळत आपल्या संघाला १९.२ षटकांत २०४/३ असा विजय मिळवून दिला.
शुभमन गिल (७ धावा) आणि साई सुदर्शन (३६ धावा) ही सलामीची दुकली लवकर बाद झाल्यानंतर गुजरातचा संघ अडचणीत सापडला होता. परंतु जोस बटलरने रुदरफोर्डसोबत मोठी भागीदारी रचत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. इंग्लंड वेस्ट इंडिजच्या खेळाडूंच्या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी निर्णायक ११९ धावांची भागिदारी रचत गुजरातला विजयासमीप आणले. बटलरने खेळपट्टीचा चांगलाच फायदा घेतला. कमजोर चेंडूवर त्याने हल्ला चढवत त्यांना सीमारेषेबाहेर फेकले. या सामन्यात त्याने केवळ ३२ चेंडूंत अर्धशतक झळकावले. तसेच १५व्या षटकात त्याने मिचेल स्टार्कला सलग पाच चौकार मारले. दुसरीकडे, रदरफोर्डनेही त्याला छान साथ दिली. त्याने मोहित शर्माला सलग दोन षटकार ठोकले. राहुल तेवतियाने स्टार्कला षटकार आणि चौकार सामना संपवला. त्यामुळे अवघ्या ३ फलंदाजांना आपल्या ताब्यात धावांनी बटलरचे शतक हुकले. याआधी, प्रसिध कृष्णासह गुजरातच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या फलंदाजांना आपल्या ताब्यात ठेवले.
तत्पूर्वी प्रथम फलंदाजी करताना दिल्लीच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी खेळता आली नाही. अभिषेक पोरेल आणि करुण नायर या सलामीच्या जोडीने २३ धावांची भागीदारी केली. पोरेलने १८, तर नायरने ३१ धावांची भर घातली. त्यानंतर केएल राहुलने फटकेबाजीला सुरुवात केली होती. मात्र त्याला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. त्याने १४ चेंडूंत २८ धावा चोपल्या. त्यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. मधल्या फळीत अक्षर पटेल, स्टब्स, आशुतोष शर्मा यांनी उपयुक्त खेळी खेळली.
फलंदाजांना अनुकूल अशा खेळपट्टीवर प्रसिध कृष्णाने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने ४ षटकांत ४१ धावा देत ४ विकेट मिळवल्या. त्यामुळे दिल्लीची धावसंख्या नियंत्रणात ठेवण्यात गुजरातला यश आले.
संक्षिप्त धावफलक :
गुजरात टायटन्स : १९.२ षटकांत ३ बाद २०४ (जोस बटलर नाबाद ९७, शर्फेन रदरफोर्ड ४३ धाव, साई सुदर्शन ३६ धावा; कुलदीप यादव ३०/१) वि. वि. दिल्ली कॅपिटल्स २० षटकांत ८ बाद २०३ (अक्षर पटेल ३९ धावा, ट्रिस्टन स्टब्स ३१ धावा; प्रसिध कृष्णा ४/४१)