रशिदमुळे गुजरातची बाजी; राजस्थानचा पहिला पराभव

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार संजू सॅमसन (३८ चेंडूंत नाबाद ६८) आणि रियान पराग (४८ चेंडूंत ७६) यांच्या अर्धशतकांमुळे राजस्थानने २० षटकांत ३ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (२४) व जोस बटलर (८) स्वस्तात बाद झाल्यावर सॅमसन व पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचली.
रशिदमुळे गुजरातची बाजी; राजस्थानचा पहिला पराभव

जयपूर : करामती रशिद खानने ११ चेंडूंत फटकावलेल्या नाबाद २४ धावांच्या बळावर गुजरात टायटन्सने बुधवारी रात्री आयपीएलमध्ये रोमहर्षक लढतीत राजस्थान रॉयल्सचा ३ गडी राखून अखेरच्या चेंडूवर पराभव केला. गुजरातचा हा सहा सामन्यांतील तिसरा विजय ठरला, तर राजस्थानला पाच लढतींमध्ये पहिला पराभव पत्करावा लागला.

प्रथम फलंदाजी करताना कर्णधार संजू सॅमसन (३८ चेंडूंत नाबाद ६८) आणि रियान पराग (४८ चेंडूंत ७६) यांच्या अर्धशतकांमुळे राजस्थानने २० षटकांत ३ बाद १९६ अशी धावसंख्या उभारली. यशस्वी जैस्वाल (२४) व जोस बटलर (८) स्वस्तात बाद झाल्यावर सॅमसन व पराग यांनी तिसऱ्या विकेटसाठी १३० धावांची भागीदारी रचली. या दोघांनीही यंदाच्या आयपीएलमधील तिसरे अर्धशतक साकारले. त्यानंतर शिम्रॉन हेटमायरने ५ चेंडूंत १३ धावा फटकावून राजस्थानला दोनशे धावांच्या जवळपास नेले.

लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार शुभमन गिलने (४४ चेंडूंत ७२) गुजरातसाठी दमदार खेळी साकारली. त्याने ६ चौकार व २ षटकारांसह दुसरे अर्धशतक झळकावले. मात्र अन्य फलंदाजांची साथ न लाभल्याने गुजरात एकवेळ १७.३ षटकांत ६ बाद १५७ अशा स्थितीत होता. तेथून रशिद व राहुल तेवतिया यांची जोडी जमली. त्यांनी अखेरच्या १५ चेंडूंत आवश्यक ४० धावा केल्या. २०व्या षटकातील पाचव्या चेंडूवर तेवतिया ११ चेंडूंत २२ धावांवर बाद झाला. मात्र रशिदने अखेरच्या चेंडूवर २ धावांची गरज असताना चौकार लगावून गुजरातचा विजय साकारला. त्याने एक बळीसुद्धा मिळवल्याने तोच सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

logo
marathi.freepressjournal.in