राष्ट्रकुल स्पर्धेत संकेतच्या रौप्यपदकानंतर गुरुराजाने जिंकले कांस्यपदक;भारताच्या पदकसं‌ख्येत वाढ

संकेतने स्नॅच आणि क्लीन ॲण्ड जर्कमध्ये एकूण २४८ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले.
राष्ट्रकुल स्पर्धेत संकेतच्या रौप्यपदकानंतर गुरुराजाने जिंकले कांस्यपदक;भारताच्या पदकसं‌ख्येत वाढ

बर्मिंगहॅम येथे २२ व्या राष्ट्रकुल स्पर्धेत सांगलीच्या वाळवा तालुक्यातील संकेत सरगरने वेटलिफ्टिंगमध्ये ५५ किलो वजनी गटात रौप्यपदक पटकाविले. यामुळे भारताचे पदक तालिकेतील खाते उघडले गेले. संकेतच्या रौप्यपदकानंतर गुरुराजाने कांस्यपदक मिळवून भारताची पदकसं‌ख्या वाढविली. संकेतचे सुवर्णपदक दुखापतीमुळे थोडक्यात हुकले. संकेतला फायनलमध्ये १४३ किलो वजन उचलताना दुखापत झाली. यंदाच्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक आहे. संकेतने स्नॅच आणि क्लीन ॲण्ड जर्कमध्ये एकूण २४८ किलो वजन उचलून रौप्यपदक पटकावले. पहिल्या फेरीत म्हणजे स्नॅचमध्ये त्याने सर्वोत्तम ११३ किलो वजन उचलले. दुसऱ्या फेरीत म्हणजेच क्लीन ॲण्ड जर्कमध्ये १३५ किलो वजन उचलून पदक जिंकले.

संकेतने आपले रौप्य पदक देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्य सैनिकांना अर्पण केले. संकेत हा कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. खेलो इंडिया युथ गेम्स २०२० आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स २०२० मध्येही तो चॅम्पियन होता. संकेतच्या नावावर ५५ किलो गटात २५६ किलो वजन उचलण्याचा राष्ट्रीय विक्रम आहे. संकेतच्या वडिलांचे सांगलीत पानाचे दुकान आहे. त्याला वडिलांना आराम करताना पहायचे आहे.

तो म्हणाला होता की, ‘वडिलांनी माझ्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. मला आता त्यांना आनंद द्यायचा आहे.

ट्रक ड्रायव्हरच्या मुलाने जिंकले कांस्यपदक

वेटलिफ्टर गुरुराज पुजारीने पुरुषांच्या ६१ किलो वजनी गटात कांस्यपदक मिळविले. राष्ट्रकुल २०२२ मधील भारताचे हे दुसरे पदक आहे. या सामन्यातील सुवर्णपदक मलेशियाच्या मोहम्मद अंजीलने पटकाविले. त्याचवेळी पापुआ न्यू गिनीच्या मोरे बेयूने रौप्य पदक जिंकण्यात यश मिळविले. गुरुराजने केवळ २६९ किलो वजन उचलून पदक जिंकले. गुरुराजने स्नॅचमध्ये ११८ किलो आणि क्लीन अँड जर्कमध्ये १५१ किलो वजन उचलले.

विजेत्या गुरुराजाचा आतापर्यंतचा प्रवास खूप खडतर होता. वडील ट्रक चालक असलेल्या गुरुराजाला आणखी चार भाऊ आहेत आणि एवढ्या मोठ्या कुटुंबासोबत राहणे कधीच सोपे नव्हते. गुरुराजाचे वडील त्याला वेटलिफ्टरला आवश्यक असलेला आहार देऊ शकत नव्हते. पण या गरीब कुटुंबातील मुलाने हार मानली नाही. वेटलिफ्टरपूर्वी गुरुराजा कुस्तीपटू होता. २००८ मध्ये सुशील कुमारने ऑलिम्पिक पदक जिंकल्याने गुरूराजा अतिशय प्रभावित झाला होता. कर्नाटकातील उडीपी जिल्ह्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या गुरुराजाने आपणही देशासाठी पदक जिंकणार असा निर्धार केला होता.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in