

गुवाहाटी : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील गुवाहाटी येथे होणारी दुसरी कसोटी नियोजित वेळेपेक्षा अर्धा तास लवकर म्हणजेच ९ वाजता सुरू होणार आहे. पूर्वेकडील भागात लवकर होणारा अंधार विचारात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे.
१४ तारखेपासून भारत-आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका रंगणार आहे. येथील पहिली कसोटी कोलकाता येथील ईडन गार्डन्स येथे, तर दुसरी कसोटी २२ नोव्हेंबरपासून गुवाहाटी (बारस्परा स्टेडियम) येथे दुसरी कसोटी खेळवण्यात येईल. पहिल्या कसोटीसाठी प्रत्येकी ६० रुपयांना एका दिवसाचे तिकीट देण्यात येणार आहे. म्हणजेच ३०० रुपयांत पाचही दिवसांचा खेळ चाहते पाहू शकतात.
पहिल्या कसोटीत दोन तासांच्या खेळानंतर उपाहाराऐवजी प्रथम चहापानाचा ब्रेक घेण्यात येईल, असे समजते. त्यामुळे ९ ते ११ पहिले सत्र असेल. मग ११.२०ला दुसरे सत्र सुरू होईल.
दरम्यान, भारताविरुद्धच्या मालिकेसाठी टेम्बा बव्हुमाचे आफ्रिकेच्या संघात पुनरागमन झाले आहे. ३५ वर्षीय बव्हुमाच्या नेतृत्वात आफ्रिकेने जून महिन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारून जागतिक कसोटी अजिंक्यपद म्हणजे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची मानाची गदा मिळवली. त्यानंतर सप्टेंबरच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत बव्हुमाला स्नायूंची दुखापत झाली. त्यामुळे तो २ महिने क्रिकेटपासून दूर होता. पाकिस्तानविरुद्ध नुकताच झालेल्या कसोटी मालिकेतही तो सहभागी झाला नाही. मात्र भारताविरुद्धच्या मालिकेद्वारे तो पुनरागमन करण्यास सज्ज आहे.
दुसरीकडे भारताचा संघ लवकरच जाहीर करण्यात येणार असून शुभमन गिल भारताचे नेतृत्व करणार आहे. भारताने नुकताच वेस्ट इंडिजला कसोटी मालिकेत २-० असे हरवले होते.
