अर्धशतके चौघींची, आघाडी भारताची! स्मृती, जेमिमा, रिचा, दीप्ती यांची दमदार फलंदाजी

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१९ धावांत गुंडाळणाऱ्या भारताकडे आता एकूण १५७ धावांची आघाडी असून दुसऱ्या दिवसअखेर दीप्ती ७०, तर पूजा वस्त्रकार ३३ धावांवर नाबाद आहे.
अर्धशतके चौघींची, आघाडी भारताची! स्मृती, जेमिमा, रिचा, दीप्ती यांची दमदार फलंदाजी
PM

मुंबई : ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघातील एकमेव कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही भारतीय संघानेच वर्चस्व गाजवले. महाराष्ट्राची स्मृती मानधना (१०६ चेंडूंत ७४ धावा), मुंबईकर जेमिमा रॉड्रिग्ज (१२१ चेंडूंत ७३), पदार्पणवीर रिचा घोष (१०४ चेंडूंत ५२) आणि अष्टपैलू दीप्ती शर्मा (१४७ चेंडूंत नाबाद ७०) या चौघींनी झळकावलेल्या अर्धशतकांच्या बळावर भारतीय महिला संघाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद ३७६ धावांपर्यंत मजल मारली आहे.

ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २१९ धावांत गुंडाळणाऱ्या भारताकडे आता एकूण १५७ धावांची आघाडी असून दुसऱ्या दिवसअखेर दीप्ती ७०, तर पूजा वस्त्रकार ३३ धावांवर नाबाद आहे. त्यामुळे या जोडीसह उर्वरित फलंदाज शनिवारी भारताची आघाडी कितपत वाढवणार, हे पाहणे रंजक ठरेल. खेळपट्टीवर चेंडू पुरेसा वळू लागल्याने भारतीय संघ शनिवारीच ऑस्ट्रेलियाला गुंडाळून डावाच्या फरकाने विजय मिळवणार का, याकडेही चाहत्यांचे लक्ष लागून आहे.

तत्पूर्वी, गुरुवारच्या १ बाद ९८ धावांवरून पुढे खेळताना स्मृती व स्नेह राणा यांनी सावध सुरुवात केली. दोघींनी दुसऱ्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी रचली. अॅश्लेघ गार्डनरने राणाचा (९) त्रिफळा उडवून ही जोडी फोडली. दुसऱ्या बाजूने स्मृतीने कसोटी कारकीर्दीतील तिसरे अर्धशतक साकारले. मात्र चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात स्मृती धावचीत झाली. ३ बाद १४७ वरून २० वर्षीय रिचा व २३ वर्षीय जेमिमा यांनी संघाला सावरले. दोघींनी चौथ्या विकेटसाठी ११३ धावांची भागीदारी रचताना भारताला आघाडी मिळवून दिली.

रिचाने पदार्पणातच अर्धशतक झळकावले, तर जेमिमाने सलग दुसऱ्या कसोटीत अर्धशतक साकारण्याची किमया साधली. जेमिमाने ९, तर रिचाने ७ चौकार लगावले. किम गार्थने रिचाचा अडथळा दूर केला. त्यानंतर गार्डनरने कर्णधार हरमनप्रीत कौर (०) व यास्तिका भाटिया (१) यांना लागोपाठच्या षटकात पायचीत पकडले. जेमिमालाही तिनेच माघारी पाठवले. त्यामुळे भारताची ३ बाद २६० वरून ७ बाद २७४ अशी घसरगुंडी उडाली.

मात्र इंग्लंडविरुद्ध अष्टपैलू छाप पाडणाऱ्या दीप्तीने यावेळेसही नेटाने किल्ला लढवला. तिने ९ चौकारांसह कारकीर्दीतील चौथे अर्धशतक साकारले असून पूजा वस्त्रकारसह आठव्या विकेटसाठी १०२ धावांची भागीदारी रचली आहे. पूजा ४ चौकारांसह ३३ धावांवर नाबाद आहे. ऑस्ट्रेलियाने खराब क्षेत्ररक्षण केले, तसेच २४ अवांतर धावाही दिल्या आहेत. गार्डनरने त्यांच्याकडून सर्वाधिक ४ बळी मिळवले आहेत.

४ महिलांच्या कसोटी क्रिकेटमध्ये चौथ्यांदा एका संघातील चार फलंदाजांनी एकाच डावात अर्धशतके झळकावली. यापूर्वी भारताने २००२मध्ये आफ्रिका, ऑस्ट्रेलियाने २०१९मध्ये इंग्लंड, तर २०२३मध्ये भारताने इंग्लंडविरुद्ध अशी कामगिरी केलेली आहे.

३ भारताकडून गेल्या दोन कसोटींमध्ये (जेमिमा, शुभा सतीश, रिचा) तिघींनी पदार्पण केले. या तिघींनीही पहिल्याच डावात अर्धशतक झळकावण्याचा पराक्रम केला.

 संक्षिप्त धावफलक

g ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : ७७.४ षटकांत सर्व बाद २१९ (ताहिला मॅकग्रा ५०, बेथ मूनी ४०; पूजा वस्त्रकार ४/५३, स्नेह राणा ३/५६)

g भारत (पहिला डाव) : ११९ षटकांत ७ बाद ३७६ (स्मृती मानधना ७४, जेमिमा रॉड्रिग्ज ७३, दीप्ती शर्मा नाबाद ७०, रिचा घोष ५२; अॅश्लेघ गार्डनर ४/१००)

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in