भारताची हॅप्पी दीपावली; पाकिस्तानवर चार विकेट‌्स राखून चित्तथरारक विजय

विजयासाठी १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली.
भारताची हॅप्पी दीपावली; पाकिस्तानवर चार विकेट‌्स राखून चित्तथरारक विजय

टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर-१२ फेरीतील सामन्यात रविवारी भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर चार विकेट‌्स राखून चित्तथरारक विजय मिळविला. यामुळे भारताची जणू ‘हॅप्पी दीपावाली’च साजरी झाली. विराट कोहलीने ४ बाद ३१ अशा प्रतिकूल परिस्थितीतून संघाला मोठ्या धैर्याने बाहेर काढत हातातून निसटू शकणारा सामना जिंकून दिला. सामनावीर म्हणून गौरविण्यात आलेल्या विराट कोहलीने ५३ चेंडूंत नाबाद ८२ धावा करताना चार षटकार आणि सहा चौकार लगावले. त्याला हार्दिक पंड्याने ३७ चेंडूंत ४० धावा करून शानदार साथ दिली.

विजयासाठी १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. सलामीवीर लोकेश राहुल (८ चेंडूंत ४) दुसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर नसीम शाहच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रोहित शर्माही (७ चेंडूंत ४) फार काळ टिकला नाही. हॅरिस रौफच्या गोलंदाजीवर उडालेला त्याचा झेल इफ्तिखार अहमदने टिपला. सूर्यकुमार यादवकडून (१० चेंडूंत १५) मोठ्या अपेक्षा असतानाच रौफने त्याला मोहम्मद रिझवानच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. भारताची अवस्था ३ बाद २६ अशी निराशाजनक झालेली असतानाच अक्षर पटेल (३ चेंडूंत २) धावबाद झाला. भारताची स्थिती मग आणखीनच ४ बाद ३१ अशी िबकट झाली.

या परिस्थितीत विराट कोहलीने सर्व सूत्रे आपल्या हाती घेत डाव सावरण्यास आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण भागीदारी हार्दिकसमवेत उभारली. या दोघांनी भारताच्या विजयाच्या आशा पल्लवित ठेवल्या. अत्यंत नाजूक क्षणाला, अटीतटीच्या प्रसंगी शेवटच्या षटकात हार्दिक (३७ चेंडूंत ४०) आणि दिनेश कार्तिक (२ चेंडूंत १) हे बाद झाल्यानंतरही रविचंद्रन अश्विनच्या (१ चेंडूत १) साथीने कोहलीने ‘विराट’ विजय मिळवून दिला.

कोहलीने वैविध्यपूर्ण फटक्यांची आतषबाजी करून भारताला ‘विराट’ विजय मिळवून दिला. ३१ धावांवर चार गडी बाद झालेले असताना विराटने विराट मनोधैर्य दाखवित पाकिस्तानच्या तोंडचा घास पळविला. कोहलीच्या जिगरबाजपणामुळे टीकाकारांना जबरदस्त चपराक बसली. इफ्तिकार, मसूद यांची अर्धशतके व्यर्थ

त्याआधी, भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी प्रभावी गाेलंदाजी करत कर्णधार रोहित शर्माचा निर्णय बिनचूक ठरविला. पहिलाच विश्वचषक खेळणाऱ्या अर्शदीपने कर्णधार बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानसह ३२ धावांच्या मोबदल्यात पाकिस्तानच्या तीन फलंदाजांना पॅव्हेलियनचा रस्ता दाखविला. हार्दिक पंड्यानेही ३० धावा देत तीन विकेट‌्स घेतले. चौथ्या षटकानंतर पाकिस्तानची अवस्था २ बाद १५ अशी झालेली असताना इफ्तिकार अहमदने (३४ चेंडूंत ५१ धावा) अर्धशतकी खेळी करत डाव सावरला. तेराव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला.

मोहम्मद शमीने त्याला पायचीत केले. त्याआधी, इफ्तिकारचा एक अवघड झेल शमीच्या चेंडूवर अश्विनच्या हातून निसटला होता. शान मसूदने (४२ चेंडूंत नाबाद ५२ धावा) डावाला आकार देण्यात मोलाची भूमिका पार पाडली. पाकिस्तानच्या सहा फलंदाजांना दुहेरी आकडा गाठण्यात अपयश आले. त्यामुळे मोठे आव्हान उभारण्यात पाकिस्तानला अपयश आले. याआधी, टी-२० वर्ल्डकपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सहा सामने झाले. यापैकी भारताने तीन वेळा नाणेफेक जिंकून त्या तिन्ही सामन्यांत िवजय मिळविला होता.

शेवटच्या षटकातील थरार

भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात १६ धावांची आवश्यकता होती. पाकिस्तानचा डावखुरा फिरकीपटू मोहम्मद नवाझ गोलंदाजी करीत होता. नवाझने पहिल्याच चेंडूवर हार्दिक पंड्याला बाबर आझममार्फत झेलबाद केले. दुसऱ्या चेंडूवर दिनेश कार्तिकने एक धाव काढून पुन्हा विराटला स्ट्राइक दिली. तिसऱ्या चेंडूवर विराटने दोन धावा काढल्या. चौथा चेंडू नो बॉल ठरलेला असतानाच त्यावर विराटने शानदार षटकार लगावला. नो बॉलनंतर पुढच्याच चेंडूवर विराट त्रिफळाचीत झाला, मात्र फ्री हिट असल्यामुळे बचावला. यादरम्यान त्याने समयसूचकता दाखवत बाइजच्या तीन महत्त्वपूर्ण धावा घेतल्या. पाचव्या चेंडूवर दिनेश कार्तिक यष्टिचीत झाला. रविचंद्रन अश्विन स्ट्राइकवर आल्यानंतर नवाझचा चेंडू वाइड ठरला.

विराटच्या डोळ्यात आनंदाश्रू अन कर्णधार रोहितची मैदानाकडे धाव

अटीतटीच्या या सामन्यात विजयी झाल्यावर प्रत्येक भारतीयाच्या मनातील भावना भारतीय खेळाडूंच्या डोळ्यातूनही प्रकटली. विराटने मैदानावरच केलेलं सेलिब्रेशन व त्याला कर्णधार रोहित शर्माने दिलेली साथ पाहून कोट्यवधी भारतीय भावुक झाले. रविचंद्रन अश्विनने विजयी धाव घेताच विराट मैदानातच भावुक झाला. यानंतर रोहित, हार्दिकसह सर्वच खेळाडूंनी मैदानात धाव घेतली. विराटला उचलून घेऊन रोहितने आनंद व्यक्त केला. यंदा पहिल्यांदाच रोहित शर्मा टी-२० विश्वचषकात टीम इंडियाचे नेतृत्व करीत आहे. विद्यमान कर्णधाराने माजी कर्णधाराला उचलून घेताच अनेक क्रिकेटशौकीन भारावून गेले.

पतीचा खेळ पाहून अनुष्का नाचत होती, ओरडत होती…..

विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हिनेदेखील विराट कोहलीचे कौतुक केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टबरोबर तिने काही फोटो शेअर करत तिने त्याला खास कॅप्शनही दिले आहे. तिने लिहिले की, फारच सुंदर, अति सुंदर…. दिवाळीच्या पूर्वसंध्येला तुम्ही लोकांच्या आयुष्यात आनंद आणला आहात! मी आतापर्यंतच्या माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट सामना पाहिला. मी खेळ पाहून नाचत होते, ओरडत होते, पण आपली आई असं का करते हे आपली मुलगी पाहात होती. तिला हे समजण्यासाठी ती अजून फार लहान आहे, पण एक दिवस तिला हे नक्कीच समजेल. तिच्या वडिलांनी त्या रात्री सर्वोत्तम खेळी खेळली होती. त्याच्यासाठी तो टप्पा फार कठीण होता, पण आता तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत आणि हुशार झाला आहे. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह देशातील अनेक नेत्यांनी ट्विटच्या माध्यमातून भारतीय संघावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

मास्टरब्लास्टरने केले कौतुक

टीम इंडियाने भारतीयांना दिवाळीचे ‘गिफ्ट’ अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले आहेत. मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने एका खास पोस्टद्वारे कोहलीचे कौतुक केले. सचिनने लिहिले की, “विराट, ही तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम खेळी होती. तुला खेळताना पाहणे हे सर्वात आनंददायक होते. रौफविरुद्ध १९ व्या षटकात लाँगऑनवर बॅकफूटवर मारलेला षटकार नेहमी लक्षात राहील.” विराटने १९ व्या षटकात अत्यंत महत्त्वाच्या वेळी दोन षटकार लगावले. शेवटच्या षटकात अत्यंत हुशारीने खेळून विराटने नाबाद राहून विजयात मोलाचे योगदान दिले.

तू करू शकशील, शेवटपर्यंत उभा राहा.’’

‘‘मी विराटला फक्त एकच गोष्ट सांगत होतो, आपण मोठी भागीदारी उभी करूयात”, असे विजयानंतर बोलताना हार्दिक पंड्याने सांगितले. हार्दिक म्हणाला, कोहलीने आजपर्यंत अनेक चांगल्या खेळी केल्या आहेत. कोहलीने सुरुवातीपासून वेगळा अॅटिट्युड ठेवला. ज्या पद्धतीने त्याने दोन षटकार लगावले, ते माझ्या आयुष्यात पाहिलेले सर्वोत्तम षटकार होते. भावुक होत तो पुढे म्हणाला, ‘‘सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता आनंद आहे. आम्ही सगळे सोबत होतो. जिंकलो तरी सोबत, हरलो असतो तरी सोबत हरलो असतो.” हार्दिक विराटला म्हणाला होता, ‘‘तू करू शकशील, फक्त शेवटपर्यंत उभा राहा.’’

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in