
कटक : गेल्या काही काळापासून माझा धावांसाठी संघर्ष सुरू होता. बाहेरून गोष्टी जितक्या सोप्या दिसतात, तशा त्या नसतात. त्यामुळे संघासाठी शतक साकारण्यासह विजयात योगदान देता आल्याचे समाधान आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी सूर गवस्यामुळे मी आनंदी आहे, अशा शब्दांत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याचे मत मांडले.
३७ वर्षीय रोहितने रविवारी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ९० चेंडूंत ११९ धावांची घणाघाती खेळी साकारली. ऑक्टोबर २०२३ नंतर प्रथमच एकदिवसीय प्रकारात शतक झळकावणाऱ्या रोहितने १२ चौकार व ७ षटकारांची आतषबाजी केली. मुख्य म्हणजे या खेळीत पुन्हा एकदा त्याच्या नैसर्गिक आक्रमक शैलीत खेळताना दिसला. त्यामुळे भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडीसुद्धा घेतली. आता बुधवारी अहमदाबाद येथे तिसरी लढत खेळवण्यात येईल. मात्र त्यापेक्षाही सर्वांचे लक्ष लागून आहे ते १९ फेब्रुवारीपासून रंगणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेकडे.
“एखाद्या खेळाडूचा सूर हरवला, तर त्याच्यासाठी प्रत्येक दिवस कठीण जाऊ शकतो, हे मी जाणून आहे. गेली अनेक वर्षे मी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यामुळे माझ्याकडून संघाला नेमके काय अपेक्षित आहे, याची मला कल्पना आहे. मात्र प्रत्येक वेळी गोष्टी तुमच्या मनासारख्या होत नाहीत. बाहेरून पाहणाऱ्यांना हे सर्व सोपे असते. परंतु प्रत्यक्षात एकदा गमावलेली लय पुन्हा मिळवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते,” असे रोहित म्हणाला.
“अशा स्थितीत संयम बाळगणे गरजेचे आहे. मी माझ्या डोक्यात कधीच नकारात्मक विचार आणले नाहीत. संघासाठी जे योग्य ठरेल, त्यानुसार निर्णय घेतले. माझ्यासाठी संघाचा विजय शतक झळकावण्यापेक्षा अधिक महत्त्वाचा होता. मी शतक झळकावूनही संघ जर पराभूत झाला, तर माझ्या सूर गवसण्याला अर्थ नाही. इंग्लंडविरुद्धची मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या दोनच बाबींवर मी सध्या लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या मालिकेत बॅटमधून धावा निघाल्याने आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आत्मविश्वास बळावला आहे,” असेही रोहितने नमूद केले.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत सपशेल अपयशी ठरल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्यातही रोहित फक्त २ धावांवर बाद झाला होता. मात्र दुसऱ्या लढतीत ३०५ धावांचा पाठलाग करताना त्याने शतक साकारून भारताच्या विजयाचा मार्ग सुकर केला. त्यामुळे आता एका आठवड्यानंतर सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही रोहित कामगिरीत सातत्य राखून भारताला धडाकेबाज सुरुवात करून देईल, अशी कोट्यवधी चाहत्यांना आशा आहे.
रोहितवरही दडपण; मग आम्ही कोण!
रोहितने भारतीय संघासाठी गेल्या दशकभरात अमूल्य योगदान दिले आहे. तसे होऊनही गेल्या काही काळापासून त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह होते. रोहितसारख्या खेळाडूवरही जर स्वत:ला सातत्याने सिद्ध करण्याचे दडपण असेल, तर मग इंग्लंडच्या संघातील खेळाडूंनाही मी तेच सांगेन, की निकालाच विचार न करता आपल्या कार्यपद्धतीवर लक्ष द्या, अशी प्रतिक्रिया इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने व्यक्त केली. “सलग दोन सामने गमावल्यामुळे हताश वाटणे स्वाभाविक आहे. मात्र प्रतिस्पर्धी संघाने केलेल्या खेळाचे कौतुकही व्हायला हवे. आम्ही चांगल्या सुरुवातीचा लाभ उचलू शकलो नाहीत. रोहितने मग गोलंदाजांवर हल्लाबोल करून आम्हाला बॅकफूटवर ढकलले,” असे बटलर म्हणाला.
बेथेल चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार
इंग्लंडचा डावखुरा अष्टपैलू जेकब बेथेल स्नायूंच्या दुखापतीमुळे आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीला मुकणार आहे. इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने याविषयी माहिती दिली. २३ वर्षीय बेथेलने पहिल्या एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावले होते. मात्र त्यानंतर डाव्या पायाचे स्नायू ताणले गेल्यामुळे बेथेल दुसऱ्या लढतीला मुकला. आता तो किमान ३-४ आठवडे क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचे समजते. त्यामुळे थेट आयपीएलमध्येच बेथेलचे पुनरागमन होण्याची शक्यता आहे. बंगळुरूने यंदा बेथेलला आपल्या संघात सहभागी केले आहे. दरम्यान, बेथेलच्या जागी इंग्लंड संघात टॉम बॅन्टनला स्थान देण्यात आले आहे.