

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत भारताला लाजिरवाणा पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर माजी दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंगने भारताची कमतरता दाखवून दिली. कसोटी क्रिकेटसाठी भारताकडे त्या दर्जाचा ऑफस्पिनर नसल्याचे मत हरभजनने व्यक्त केले. तसेच वॉशिंग्टन सुंदरवर आणखी जबाबदारी टाकण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.
रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर प्रथमच घरच्या मैदानावर सेना देशाविरुद्धच्या मालिकेत भारतीय फिरकीपटू अपयशी ठरले. दोन कसोटी सामन्यांत दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी एकूण २५ बळी घेत भारताला अडचणीत टाकले. भारताकडे कसोटी क्रिकेटसाठी दर्जेदार ऑफ स्पिनर नाही, असे हरभजन म्हणाला.
हरभजनच्या मते, तमिळनाडूचा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरला ऑफस्पिनर म्हणून स्वतःला सिद्ध करण्यास अजून वेळ लागेल. तो अद्याप अश्विनसारखा पर्याय बनलेला नाही.
मला वाटते की वॉशिंग्टन सुंदरमध्ये क्षमता आहे, पण त्याला अधिक गोलंदाजी करायला लावली पाहिजे. कसोटी क्रिकेटमध्ये त्याने ३० ते ३५ षटके टाकायला हवीत. तेव्हाच तो मोठा गोलंदाज बनेल, असे हरभजन म्हणाला.
आपण ज्या प्रकारच्या खेळपट्ट्यांवर खेळतो, त्यावर चेंडू फिरतात किंवा सरळ जातात. त्यामुळे अशा खेळपट्ट्यांवर गोलंदाजी करणे सोपे असते. जेव्हा चांगल्या विकेटवर एखादा गोलंदाज बळी घेतो, तेव्हा तो मोठा गोलंदाज मानला जातो, असे हरभजन म्हणाला.